आपल्या चारचाकी वाहनाने एकटेच जळगाव जामोदकडे निघाले असता वाटेतच हृदयघातरुपी काळाने ‘त्यांना’ गाठले. दुखणे असह्य असतानाही त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नातेवाईकांना ही बाब कळविली. मात्र, कुणीही मदतीला येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

जीवन किती क्षणभंगुर आहे आणि मृत्यू एखाद्याला कसा खिंडीत गाठतो, याचे हे हृदयद्रावक उदाहरण. आज, सोमवारी सकाळी स्थानिक महात्मा फुले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मानकर (६५) आपल्या मोटारीने जळगाव जामोदकडे जात होते. शेम्बा गावानजीक कार चालवत असतानाच त्यांना छातीत दुखायला लागले. त्यांनी याबाबत तत्काळ नातेवाईकांना कळविले. मात्र काही मिनिटातच त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा: ‘भारत जोडो’चे पडद्यामागील किस्से आणि व्यवस्थापन यंत्रणेचे अनुभव

शिवाजी संस्थेतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी शैक्षणिक क्षेत्राशी जुळलेली नाळ कायम राखण्यासाठी स्वतः शाळा सुरू केली. स्थानिक शिवस्मारक समितीचे सचिव म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने महात्मा फुले शाळा परिवाराचा आधारवड कोसळला आहे. बुलढाण्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Story img Loader