लोकसत्ता टीम
नागपूर: नागपूर हे झपाट्याने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक असून शहराच्या अवाढव्य विस्तारामुळे नव्या उड्डाण पुलांसोबत भुयारी मार्गही बांधले जात आहेत. मात्र ते सोयींपेक्षा पावसाळ्यात गैरसोयीचेच अधिक ठरू लागले आहेत.
शहरात जुने आणि नवे मिळून एकूण दहापेक्षा अधिक भुयारी मार्ग (अंडरब्रिज) आहेत.थोडासा जरी पाऊस आला तरी नरेंद्रनगर भुयारी मार्ग पाण्याने तुडूंब भरतो. तेथे पाण्यााचा निचरा करण्याची सोयच नाही. शिवाय बाजूच्या नाल्यातील आणि परिसरातील वस्त्यांमधील पावसाचे पाणी नाल्याखाली येत असल्याने तेथून वाहने काढणे अवघड होते. अनेकदा वाहने पाण्यात अडकण्याची अनेक उदाहरणे आहेत. या पुलामुळे गैरसोय होणारी गैरसोय कमी होती की काय लोकांच्या सोयींसाठी बांधलेल्या मनीषनगर पुलांमुळे त्यात भर पडली. मेट्रोने बांधलेल्या या पुलाखालीही कंबरभर पाणी साचते. शहराच्या दोन भागांना जोडणारा हा पूल असल्याने तेथून वर्दळही अधिक असते. पण जोरदार पाऊस झाला की संपूर्ण पुलाखाली चार ते सहा फूट पाणी साचते.
आणखी वाचा-रेड अलर्ट! वर्धा जिल्ह्यात मुसळधार, शाळांना सुट्टी, लोकांचे स्थलांतर, वीजबळी
कॉटन मार्केटमधील लोखंडी पुलाजवळ एक नवीन भुयारी मार्ग महामेट्रोने बांधला. तो पहिल्याच पावसात पाण्याखाली आला. पुलाखालील पाण्यामुळे मानस चौक से कॉटन मार्केटकडे जाणारी वाहतूक खोळंबते. त्याच्याच जवळचा आनंद टॉकीजजवळ बांधलेल्या पुलाची अवस्था अशीच आहे. त्याखाली जमणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास दोन दिवस लागतात. जुन्या रेल्वे पुलाखालची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. छिंदवाड़ा मार्गावरील कायम पाणी साचते.