नागपुरातील श्रीकृष्ण शांतिनिकेतनची यशोगाथा
सेवेची कोणतीही पाश्र्वभूमी नाही, आर्थिक पाठबळ नाही, हाताशी फारसे मनुष्यबळ नाही तरीही केवळ जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर मतिमंद, मनोरुग्ण, अपंग, निराधारांचा अत्यंत मायेने सांभाळ करणाऱ्या श्रीकृष्ण शांतिनिकेतनच्या प्रज्ञा राऊतांचा प्रवास थक्क करणारा आहे. याच वंचितांच्या साथीने सेवेचे नंदनवन फुलवण्याचा प्रज्ञाचा मानस आहे.
आजवर शंभरपेक्षा जास्त वंचितांचा सांभाळ करणाऱ्या व सध्या २२ जणांच्या गोतावळ्यात रमणाऱ्या प्रज्ञाचा हा सेवाश्रम या शहरापासून जवळ असलेल्या बेलतरोडीला आहे. शासकीय नोकरीत असलेले पती प्रमोद, मुलगी अनुश्री या दोघांच्या मदतीने गेली अकरा वर्षे वंचितांची सेवा करणाऱ्या प्रज्ञावर मदर तेरेसा व तुकडोजी महाराजांचा प्रभाव आहे. अख्खे आयुष्य सेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रज्ञाला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मतिमंद, मनोरुग्णांना घेऊन वारंवार भाडय़ाची घरे बदलावी लागली, लोकांचे टोमणे सहन करावे लागले तरीही जिद्द न हारता बोलतरोडीत मालकीच्या भूखंडावर एक झोपडी उभारून सेवेचा यज्ञ धगधगत ठेवणाऱ्या प्रज्ञाला आता वर्धा जिल्ह्य़ातील आर्वीजवळ या वंचितांचे नंदनवन फुलवायचे आहे. त्यासाठी तिने वडिलोपार्जित असलेली जागा संस्थेला दान केली आहे. निराधारांना कुणी वालीच नसतो, पण मतिमंद व मनोरुग्णांना पालक असूनही ते सांभाळायला तयार नसतात. अशा पालकांनी सोडून दिलेल्या अनेकांचे दायित्व प्रज्ञाने अगदी हसतमुखाने स्वीकारले आहे. या साऱ्यांची सेवा करण्यासोबतच त्यांना चांगले वळण लावणे, त्यांना स्वयंरोजगाराचे धडे देणे अशी कामेही प्रज्ञा व तिचे कुटुंब अगदी निरलस वृत्तीने करते आहे. या साऱ्या वंचितांचा सांभाळ करतानाच त्यांचे आजारपण, रुग्णालयाचा खर्च, तर काहींचे वेदना देणारे मृत्यू या साऱ्या अग्निदिव्याला प्रज्ञा नित्यनेमाने सामोरी जात आहे. अशा प्रसंगांत पालकांचे तिला आलेले अनुभव या समाजाचे कुरूपता दाखवणारे आहेत. काही संस्थांनी वस्तुरूपाने दिलेला मदतीचा हात आणि यजमानांचे वेतन या बळावर प्रज्ञाची ही अनोखी सेवा अव्याहतपणे सुरू आहे. केवळ बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या व मतिमंद तसेच मनोरुग्णांना सांभाळण्याचा कोणताही अभ्यासक्रम पूर्ण न केलेल्या प्रज्ञाने केवळ अनुभवाच्या बळावर या साऱ्यांना संस्कारित करण्यासाठी घेतलेले कष्ट संस्थेला भेट देताच दिसून येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा