नागपूर : गुवाहाटी येथील आसाम राज्य प्राणिसंग्रहालयात हिमालयीन गिधाडाच्या यशस्वी कृत्रिम प्रजननाची पहिली नोंद घेण्यात आली आहे. बंदिवासातील हिमालयीन गिधाडांच्या यशस्वी प्रजननाची जगातील ही दुसरी तर भारतातील पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, फ्रान्स वगळता इतरत्र कुठेही ही प्रजाती प्रजननासाठी ठेवण्यात आलेली नाही.
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीमध्ये ‘जवळपास धोक्यात’ म्हणून हिमालयीन गिधाडाची नोंद आहे. भारतातील मैदानी प्रदेशात हिवाळ्यातील एक सामान्य स्थलांतरित आणि उच्च हिमालयातील रहिवासी अशी हिमालयीन गिधाडाची ओळख आहे. या यशस्वी प्रजननाचे तपशील अलीकडेच ‘जर्नल ऑफ थ्रेटेन्ड टॅक्सा’मध्ये प्रकाशित झाले आहेत. या तपशिलानुसार, १४ मार्च २०२२ला यशस्वी उबवणीची नोंद घेण्यात आली आणि १५ मार्चला घरटे कृत्रिम प्रजनन सुविधा असणाऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. त्या घरट्यांसाठी आवश्यक तो प्रकाश, ऊब, हवा आदीची चाचपणी वेळोवेळी करण्यात आली. २०११-२०१२ या कालावधीत या गिधाडांना विषबाधा आणि अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमधून वाचवण्यात आले होते. गुवाहाटीमध्ये त्यांचे प्रजनन करणे एक कठीण काम होते. कारण ही प्रजाती बर्फाच्छादित पर्वतांमध्ये प्रजनन करते. मात्र, त्यांना प्राणिसंग्रहालयात दीर्घकाळ ठेवण्यात आल्याने ते उष्णकटिबंधीय वातावरणात रूळले.
मोठी आशा निर्माण झाली
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञाने त्यांना या गिधाडांचे संगोपन करण्यास मदत केली, असे बीएनएचएसचे शास्त्रज्ञ सचिन रानडे यांनी सांगितले. आसाममध्ये हिमालयीन गिधाडांचे शेकडो बळी गेले आहेत आणि हा प्रयोग कृत्रिम प्रजननाद्वारे त्यांची लोकसंख्या परत आणण्याची मोठी आशा निर्माण करतो, असेही ते म्हणाले.