नागपूर : केशरचे उत्पादन हे उत्तरेकडील थंड राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरमध्येच होते.केशरची शेती करण्यासाठी वातावरण फार थंड असावे लागते. मात्र, आता ‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या अतिउष्ण नागपुरात देखील केशर शेती होत आहे. ‘एरोपोनिक्स’ तंत्रज्ञानाच्या मदतीने बंद खोलीत केशर लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.

शहरातील एका तरुण दाम्पत्याने केवळ चार बाय चारच्या एका बंद खोलीत चक्क ‘केशर’ची शेती फुलवली आहे. अवघ्या पाच महिन्यात केशर शेतीच्या माध्यमातून या तरुण दाम्पत्याला तब्बल आठ लाख रुपये किमतीच्या दीड ते दोन किलो केशरचे उत्पादन अपेक्षित आहे. सध्या तीन महिन्यात अर्धा किलो केशरचे उत्पादन देखील त्यांनी मिळवले आहे. दिव्या आणि अक्षय होले असे या तरुण व प्रयोगशील दाम्पत्याचे नाव आहे.दिव्या बँकेत अधिकारी आहे तर अक्षय यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. दोघांना शेतकरी आणि शेतीच्या बाबतीत प्रचंड ओढ आहे. आई-वडील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना कायम शेतीच्या क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची हौस होती. त्यांना इंटरनेटवर केशर शेतीच्या प्रयोगाची माहिती समजली. केशरची शेती आपल्या घरात देखील करता येते, ही संकल्पना समजल्यानंतर दिव्या आणि अक्षयने थेट काश्मीरच्या पंपोर येथे जाऊन यासंदर्भात माहिती घेतली. तेथून केशर बियाणे आणले. कांद्याच्या रोपाप्रमाणे दिसणारे केशरचे बियाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकदा लागवड केल्यानंतर पुढील पाच ते सात वर्षे त्यापासून अनेक रोपं तयार होतात. आता ‘एरोपोनिक्स’ तंत्रज्ञानाच्या मदतीने घरातल्या घरातच शंभर टक्के शुद्ध केशरची लागवड केली जाऊ शकते. विदर्भातील वातावरण देखील अवघ्या पाच महिन्यांत केशर पीक लाखो रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळवून देईल. त्यामुळे ही शेती प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. अक्षय आणि दिव्याने सुरुवातीला पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर पाच महिने योग्य ती काळजी घेतली की उत्पादनाला सुरुवात होते. होले दाम्पत्याने आता उत्पादन स्वतःचे ब्रँडिंग करून विकण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा >>>नागपूर: परीचारिकेची टास्क फ्रॉडमधून ३ लाखांनी फसवणूक

काय आहे ‘एरोपोनिक्स’ तंत्रज्ञान

गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी ‘एरोपोनिक्स’ तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये बंद खोलीत तापमानाला नियंत्रण करून शेती केली जाते. यामध्ये माती किंवा पाण्याचा उपयोग केला जात नाही. कमी वेळेत अगदी लाखोंचं उत्पादन मिळवून देणाऱ्या या नव्या आणि वेगळ्या प्रयोगाला ‘एरोपोनिक्स’ तंत्रज्ञान असे म्हणतात.

Story img Loader