नागपूर : समृद्धी महामार्ग त्याच्या निर्मितीपासून तर त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतरसुद्धा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येथे माणसांचे अपघात अजूनही थांबलेले नाहीत, पण प्राण्यांचे देखील अपघात होतच आहेत. रविवारी समृद्धी महामार्गावर नाही पण महामार्गाच्या खाली वन्यप्राण्यांसाठी तयार केलेल्या उपशमन योजनांजवळचा बिबट अडकला. महामार्गापासून खाली बराच अंतरावर ही घटना घडली असताना देखील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमूने अवघ्या अर्ध्या तासात हे “रेस्क्यू ऑपरेशन” यशस्वी केले.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झिरो पॉईंट टोल बूथ च्या भागात मुंबईवरून नागपूरकडे येताना महामार्गाच्या बाजूला वन्यजीवांसाठी बनवलेल्या भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या भुयारी मार्गाला लागून असलेल्या शेताच्या तारेच्या कुंपणात बिबट अडकला. बुटीबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांनी तातडीने नागपूर येथील प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारीतील “ट्रान्झिट ट्रीटमेंट” केंद्राला फोन केला आणि घटनेची माहिती दिली.

केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी पोहचली. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन बिबट्याला “फिजिकली रेस्क्यू” करण्याचा निर्णय घेतला. “कॅचपोल” च्या साहाय्याने बिबट्याचे पाय आणि मान फिक्स करण्यात आली. यावेळी महामार्गावर “ट्रान्झिट ट्रीटमेंट” केंद्राचे वाहन तयारच ठेवण्यात आले. बिबट्याला बेशुद्ध न करताच यशस्वीरित्या कुंपणातून सोडवून केंद्राच्या रेस्क्यू वाहनात टाकण्यात आले. तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यामुळे उपचारासाठी त्याला “ट्रान्झिट ट्रीटमेंट” केंद्रात आणले.

प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वडे, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्यात वेगवान “फिजिकल रेस्क्यू” ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. या “रेस्क्यू ऑपरेशन” मध्ये हरीश किनकर, प्रतीक घाटे, सानप, आंधळे, समीर नेवारे हे सर्व वनरक्षक तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. सिद्धांत मोरे तसेच बंडू मंगर, खेमराज नेवारे, विलास मंगर, आशिष महाले सहभागी होते. अलीकडेच नागपूर भेटीत वनमंत्र्यांनी अनंत अंबानी यांच्या “वनतारा” चे गोडवे गात एकप्रकारे खात्यावरच अविश्वास दाखवला. मात्र, आतापर्यंत अनेक वन्यप्राण्यांना जीवदान देऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणाऱ्या “ट्रान्झिट ट्रीटमेंट” केंद्राने पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी करत वनखाते कुठेही मागे नसल्याचे दाखवून दिले.