कुठलेही शैक्षणिक यश मिळवताना त्यासाठी पैसा आणि अन्य सोयी सुविधा असल्या पाहिजे असे नाही. शिक्षणाची इच्छा असली आणि परिस्थितीची जाणीव असेल आणि आई-वडिलांचा आधार नसेल तरी सामान्य राहून शिक्षण घेता येऊ शकतो. आई-वडिलांचे प्रेम नाही आणि तरी सामान्यांच्या बरोबरीने किंवा त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवणारी अनेक मुले समाजात आहेत. नागपुरातील प्लॅटफार्म शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि विमलाश्रमातील विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत शैक्षणिक क्षेत्रात केलेली कामगिरी अनेकांना आदर्श ठरणारी आहे.
उदयनगर भागात असलेल्या विमलाश्रमात राहणाऱ्या छकुली बारापात्रे आणि जया भाटी या विद्यार्थिनींनी अनुक्रमे ६४ आणि ६१ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. याच आश्रमातील मेघा राजन सिंग हिला ८७ टक्के गुण मिळाले आहे.
गोळीबार चौक येथे राहणाऱ्या छकुलीच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी छकुलीसह तिच्या लहान बहिणीला रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमात आणून दिल्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्या दोघी आश्रमामध्ये राहतात. छकुली आश्रमात आली त्यावेळी ती सातवीत होती. जया भाटी ही सुद्धा २०१२ मध्ये तीन बहिणी आणि लहान भावासह विमलाश्रमात आले. वडील गेल्यानंतर आईने चारही मुलांना सोडून दिले.
त्यामुळे मावशीने काही दिवस ठेवल्यानंतर तिनेही मुलांना सोडून दिले होते. मात्र, रामभाऊ इंगोले यांनी चारही मुलांचा स्वीकार केला आणि त्यांना आश्रमात आणले. त्यातील मोठी मुलगी जया ही दहावीत असून तिला ६१ टक्के गुण मिळाले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी यश मिळवल्यानंतर आईवडिलांकडून जे कौतुक केले जाते ती कौतुकाची थाप मात्र त्यांच्या पाठीवर पडणारी नसली तरी रामभाऊंनी त्याचे कौतुक केले. मेघा सिंग ही पिंकी सिंगची मुलगी आहे. पिंकी ही विमलाश्रमात राहत असताना त्या ठिकाणी तिने शिक्षण घेतले.
तिचा विवाह झाला आणि तिची मुलगी मेघा ही सुद्धा विमलाश्रमात राहत असताना तिने हे यश मिळवले. मेघाला डॉक्टर व्हायचे आहे. जया आणि छकुली या पाचगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या.
छकुलीला वकील व्हायचे आहे, तर जयाला प्रशासकीय अधिकारी होऊन समाजाची सेवा करायची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा