लोकसत्ता टीम
अमरावती : नवजात बाळाच्या पोटातही गर्भसदृश्य गोळा असल्याचा अतिदुर्मिळ प्रकार बुलडाण्यात काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
दरम्यान त्या बाळाच्या पोटातील गर्भसदृष्य गोळा काढण्यासाठी येथील सुपर स्पेशालिटीमध्ये त्याला दाखल केले होते. तीन दिवसांच्या बाळावर ४ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी बाळाच्या पोटातून अर्भकसदृश्य मांसाचे दोन गोळे काढले. त्यानंतर बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले. तब्बल १७ दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी बाळाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
१ फेब्रुवारीला बुलडाणा जिल्ह्यातील एका महिलेने सव्वादोन किलोग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. या बाळाच्या पोटातही गर्भसदृश्य गोळा असल्याचे प्रसूतीपूर्वी केलेल्या सोनोग्राफीत दिसून आले होते. बाळाची शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून ते गोळे बाहेर काढले.
वैद्यकीय भाषेत या प्रकाराला ‘फिट्स इन फिटू’ म्हणतात. अर्भकसदृश्य हाडामांसाचा गोळा एखाद्या बाळाच्या पोटात वाढणे, असा हा प्रकार असतो. जगात आतापर्यंत अशा ३३ घटनांची नोंद आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये फक्त एकच गोळा दिसून आला होता. या बाळाच्या पोटातून मात्र दोन गोळे बाहेर काढण्यात आले. बाळाला ३ फेब्रुवारीपासून मातेपासून वेगळे ठेवत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला आणले.
सायंकाळपर्यंत शस्त्रक्रियेपूर्वीच्या सर्व चाचण्या केल्या. बाळ शस्त्रक्रियेसाठी ‘फिट’ असल्याने डॉक्टरांनी ४ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया केली. त्यानंतर सुपर स्पेशालिटीतील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने या बाळाकडे विशेष लक्ष दिले. १७ दिवसांच्या उपचारानंतर बाळ सुदृढ झाल्याने त्या बाळाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
वैद्यकीय चमूचा सत्कार
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील ‘फिट्स इन फिटू’ची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ व चमूचा आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, संजय खोडके यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी त्या बाळाचे आई – वडील उपस्थित होते. यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सातत्याने मेहनत घेत रुग्णाच्या संपूर्ण आरोग्य सुधारासाठी आवश्यक ती काळजी घेतली. सर्व उपचार यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर बाळाला निरोगी स्थितीत घरी पाठविण्याचा हा एक भावनिक आनंदाचा क्षण असून ही वैद्यकीय उपलब्धी केवळ विभागीय स्तरावरच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. अशा भावना आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केल्या.