लोकसत्ता टीम
नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. अडबाले यांना महाविकास आघाडीने समर्थन दिले होते. मात्र, आता अडबाले ज्योतिष्यशास्त्राचे धडे देणाऱ्या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ करावे यासाठी प्रयत्न करत असल्याने शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
संस्कृत विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभेत त्यांनी कुलगुरूंना तसे पत्र देऊन राज्य व केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रात म्हटले आहे की, संस्कृत भाषा, साहित्य आणि इतर भारतीय भाषांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य आणि विद्यापीठ कटीबद्ध आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना आणि भक्कम वित्तीय पाठबळाशिवाय संस्कृतचा विकास पाहिजे तेवढ्या जलद गतीने करता येणे शक्य नाही. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे. विद्यापीठात संस्कृत भाषेच्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन पदवी अभ्यासक्रम चालवले जातात.
आणखी वाचा-चार दिवसांनी घरचा चहा प्यायले! मुलीने किराणा ऑनलाईनद्वारे पाठवला; पूरग्रस्तांची व्यथा
या विद्यापीठाला विकासाच्या दृष्टीने नागपूर येथे ५० एकर जागा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास विद्यापीठाला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल. यामुळे विद्यापीठाचा विकास होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केली.