चंद्रपूर : निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव टाकून अपमान केल्याची खंंत बाळगून माजी मंत्री तसेच चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित माजी मुख्यमंत्री तथा चंद्रपूरचे सुपुत्र कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार होते.
चंद्रपूरचे सुपुत्र महाराष्ट्राचे व दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्याचे आयोजन आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात केले होते. या साेहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जोगरेवार यांनी ठिकठिकाणी मोठ-मोठे फलक लावले होते. संपूर्ण चंद्रपूर शहर हे भाजपचे झेंडे व जोरगेवार यांच्या फलकाने न्हावून निघाले होते. जिकडे-तिकडे फलक दिसून येत होते. मात्र, जोरगेवार यांनी शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री तथा चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव पत्रिकेत शेवटी टाकून अपमान केल्याची खंत बाळगून मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
हे ही वाचा… आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना निमंत्रण पत्रिकेत मुनगंटीवार यांच्यापेक्षा वरचे स्थान दिले. त्यामुळेही मुनगंटीवार नाराज आहेत अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी होती. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी मंचावर ठेवण्यात आलेल्या सोफ्यावर सर्व निमंत्रित पाहुण्यांच्या नावांची पाटी लावण्यात आली होती. मात्र मुनगंटीवार यांचे नाव कोणत्याही सोफ्यावर नव्हते. यावरूनच मुनगंटीवार यांना कार्यक्रमात योग्य सन्मान मिळाला नाही हे स्पष्ट दिसून आले. या कार्यक्रमाला आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार करण देवतळे देखील अनुपस्थित होते.
हे ही वाचा… भंडारा : धक्कादायक! एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन; त्यातही घरगुती सिलेंडर…
मुनगंटीवार हे राज्यातील भाजपचे जेष्ठ नेते आहेत. स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच मुनगंटीवार यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली, अशीच चर्चा आहे. कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार किशोर जोरगेवार या दोघांच्या नावा शिवाय कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांचे नाव होते.
मुनगंटीवार नाराज नाही – फडणवीस
मुनगंटीवार व माझ्यात कुठलाही वाद नाही तसेच ते नाराज देखील नाही. मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मला फोन होता. कार्यक्रमासाठी येणार का यासंदर्भात आमचे फोनवर बोलणे झाले होते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले,
चंद्रपुरात प्रथम येतं आहे. त्यामुळे कार्यक्रमाला यायचे होते. मात्र व्यक्तिगत कामात व्यग्र असल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. ते नाराज नाहीत तसेच पक्षात स्थानिक पातळीवर काही वाद नाही. ही केवळ माध्यमांमध्ये चर्चा आहे. आणि माध्यमांनीच हे सर्व उभे केले आहे, असे फडणवीस म्हणाले.