चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे काही नेते पोरकटपणा करीत होते. लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान करीत होते. पण मला त्याचे नवल वाटले नाही, कारण संविधानाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती जुनी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील तरतुदींचा दुरुपयोग करीत या देशावर ४९ वर्षांपूर्वी आणीबाणी लादण्याचे कामही यांनीच केले होते. त्यामुळे लोकशाहीचा अपमान करणाऱ्या संविधान विरोधकांच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील गांधी चौकात आयोजित आणीबाणी निषेध सभेत मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, विजय राऊत, रमेश भुते, महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आणीबाणीमध्ये कारावास भोगणारे आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधान बचाओ काँग्रेस हटाओ असा नारा देत कुटुंबापासून लांब कारावासात राहणारे नारायणराव पिंपळापुरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ‘निषेध असो निषेध असो आणीबाणीचा निषेध असो, भारत माता की जय, वंदे मातरम, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा’ अश्या घोषणा उपस्थितांनी दिल्या.

हेही वाचा >>>नागपुरातील’ हिट अँड रन ‘ प्रकरणात आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नाकारला…

 मुनगंटीवार म्हणाले, ‘४९ वर्षांपूर्वी २५ जून १९७५ हा देशाच्या लोकशाहीतील काळा दिवस होता. तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी निवडणुकीत गैरव्यवहार केला आणि सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर केला त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याचा धाडसी निर्णय अलाहबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ ला दिला. वाघाच्या छातीचे न्यायमूर्तीनी संविधानाच्या तरतुदीनुसार ‘या देशात कुणी छोटा नाही कुणी मोठा नाही,’ या भावनेने न घाबरता निर्णय दिला. पण काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी संविधानाच्या तरतुदीचा दुरुपयोग करीत स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कुटुंबाला संविधानापेक्षा मोठे सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपतींवर दबाव टाकून या देशात आणीबाणी लावली. आज त्याच आणीबाणीचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत.’ ‘आणीबाणीमध्ये वर्तमानपत्रात एकही शब्द विरोधात लिहिता येत नव्हता. आकाशवाणी असो वा दूरदर्शन असो, स्व. इंदिरा गांधी किंवा काँग्रेसच्या विरोधात एकही शब्द उच्चारला तर अधिकाऱ्याची गच्छंती व्हायची. माझे वडील संघाच्या शाखेत जाऊन ‘नमस्ते सदा वत्सले’ म्हणतात म्हणून त्यांना १९ महिने तुरुंगात टाकण्यात आले होते. पण घरी अन्न धान्य नसताना,  आर्थिक अडचणी असताना देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी १९ महिने घरावर तुळशीपत्र ठेवून तुरुंगवास भोगणाऱ्या सर्व राष्ट्रभक्तांना माझा सलाम आहे. एकाही राष्ट्रभक्ताने स्व. इंदिरा गांधी यांची क्षमा मागितली नाही. संविधानाचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे, हे समजून जीवन समर्पित केले. श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी, जॉर्ज फर्नांडिसजी देखील कारागृहात होते. अश्या देशभक्तांचा आपल्याला अभिमान आहे. कारण त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीवर मात करीत ‘भारत माता की जय’ म्हणत तुरुंगवास सहन केला,’ अश्या भावनाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>>सावधान ! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

काँग्रेससाठी ‘मेरा परिवार, मेरा देश’!

तुर्कमान गेटवर असलेल्या आमच्या मुस्लीम परिवारांची हजारो घरे तोडून टाकली. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई बद्दलचे प्रेम न करता आपली खुर्ची वाचली पाहिजे, हेच काँग्रेसचे लक्ष्य होते. एक काँग्रेस नेता स्व. इंदिराजींना विनंती करायला गेला की,आपण खुर्ची वाचविण्यासाठी संविधानाचा दुरुपयोग करीत आहोत. तर दुसऱ्या दिवशी त्यालाही तुरुंगात टाकले. कारण त्यांच्यासाठी ‘मेरा परिवार मेरा देश’ हाच नारा होता. आज देशगौरव पंतप्रधान मोदीजी म्हणतात ‘मेरा देश, मेरा परिवार है’. आपला लढा आजही देशासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे. काँग्रेसने संविधानाचा अपमान करण्यात कुठेही कसर सोडली नाही. आपण संविधानाचे रक्षण करीत आलो आणि आजही संविधानाच्या रक्षणाचाच संकल्प करीत आहोत,’ असेही मुनगंटीवार म्हणाले. 

हुकुमशाही प्रवृत्तीला जागेवर ठेचण्याचा संकल्प करा

काँग्रेसचे लोक जातीचा प्रचार करून, लोकांमध्ये भिती निर्माण करून सत्तेत येत गेले. त्या काँग्रेसच्या राज्यात श्यामा प्रसाद मुखर्जींना स्लो पॉयझन देणारा, पं. दिनदयाल उपाध्याय यांची निर्घुण हत्या करणारा आरोपी कधीच सापडला नाही. काँग्रेसला जिथे अडचण आली, तिथे संशयास्पद घटना घडल्या आहेत. काँग्रेस पक्ष सत्तांध होऊन लोकशाहीच्या विरोधात कृती करीत आला आहे. आज आणीबाणीच्या त्या दुर्दैवी घटनेचे स्मरण करून येथून जातांना अशा हुकुमशाही प्रवृत्तीला जागेवर ठेचायचे आहे आणि लोकशाहीचा मंगलकलश आपल्या हाती येण्यासाठी बलिदान देणाऱ्यांची जाणीव ठेवायची आहे, एवढाच संकल्प करा, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

फक्त निषेध नको!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांत तीव्र आंदोलन चिमूरमध्ये झाले. १६ अॉगस्ट १९४२ ला युनियन जॅक खाली आला आणि तिरंगा फडकला. अशा वाघाच्या भूमीतील आपण नागरिक आहोत. त्यामुळे आणीबाणीचा फक्त निषेध करून थांबता येणार नाही. संविधानाचा अपमान करणाऱ्यांच्या आणि संसदेत पोरकटपणा करणाऱ्यांच्या विरोधातील लढा अधिक तीव्र झाला पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar appeal to those who insult democracy and constitution chandrapur rsj 74 amy