चंद्रपूर:जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. ही आनंदाची बाब आहेच, पण आता महाराष्ट्राच्या विकासासाठी वाघासारखा पराक्रमदेखील करावा लागेल, असे आवाहन राज्याचे वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Video : चंद्रपुरात मुसळधार पाऊस व गारपीट; आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी

पोलीस मुख्यालय येथे ६३व्या महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. झेंडावंदन व परेडचे निरीक्षण झाल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महापालिका आयुक्त विपीन पालिवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला महाराष्ट्रदिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. ते म्हणाले, ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा… या महाराष्ट्र गितातील ओळींप्रमाणे जबाबदारी पूर्ण करण्याचा संकल्प सोडणे म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करणे होय. महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी देशाच्या प्रगतीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली. पण त्यांचे फक्त स्मरण करून होणार नाही. त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.’ संविधानातील नागरिकांच्या कर्तव्यांची त्यांनी आठवण करून दिली. संविधानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांची कर्तव्ये देखील नमूद केलेली आहेत. दुर्दैवाने आज देशात ते संविधानातील मूलभूत कर्तव्य वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. चंद्रपूरकरांनी ही जबाबदारी पार पाडणे हाच खरा महाराष्ट्र दिनाचा संकल्प ठरेल,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा >>> नाना पटोलेंच्या गृह जिल्ह्यात सात बाजार समित्यांपैकी सहा ठिकाणी भाजपाचा विजय

राज्याचा अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेव्हेन्यू सरप्लस ११ हजार ७५ कोटी केला. आज देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. चंद्रपूरचा नागरिक म्हणून मला याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूरच्या विकासाची २०५ कामे

चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी २०५ कामांचे नियोजन केले. वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, सैनिक शाळा यासोबत आता टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे काम सुरू आहे. टाटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ९० गावे दत्तक घेऊन कृषी उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘मिशन जय किसान’ या योजनेतून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्प केला आहे, असेही ते म्हणाले.

अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. स्व. गोपिनाथ मुंडे पीक विमा योजनेतील सानुग्रह अनुदान २ लाख रुपये करण्यात आला असून २०१८ पासून १० कोटी २९ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. फक्त १ रुपयांत पिक विमा योजना आणल्याचेही ते म्हणाले.

अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र

राज्यातील उत्तम आरोग्य सेवा चंद्रपुरात मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची उभारल्या जात आहेत. १४ नवीन इमारतींचे काम झाले असून इतर इमारतींचे लवकरच पूर्णत्वास येईल. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र अस्तित्वात येतील, असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. यासोबतच आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या योजनेअंतर्गत १५ ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि नागरी आरोग्य केंद्र आजपासून नागरिकांच्या सेवेत येत असल्याचे  मुनगंटीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar attend flag hoisting ceremony on occasion of 63rd maharashtra day at police headquarters rsj 74 zws