काँग्रेस सरकारच्या काळात अर्थसंकल्पात केवळ घोषणा केल्या जात होत्या. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात मात्र विकासाचा संकल्प करुन अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा प्रमुख मुद्द्यांवर अर्थसंकल्प सादर करुन सर्व वर्गाला न्याय दिला असल्याचे मत राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>“पदवीधर निवडणुकीच्या अवैध मत फेरमोजणी प्रसंगी…”, निकालानंतर धीरज लिंगाडे यांचा गौप्यस्फोट
केंद्रीय वित्त मंत्री निर्माला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर मुनगंटीवार बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीच्यावतीने आशीर्वाद लॉन येथे अर्थसंकसंकल्पावर चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सनदी लेखापाल जय रानडे व शहर अध्यक्ष प्रवीण दटके उपस्थित होते. ते म्हणाले, हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाहीतर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला अर्थसंकल्प आहे. करोनाच्या २८ महिन्याच्या काळात ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले. काँग्रेसच्या काळात ज्या योजनांचा विचार करण्यात आला नाही, अशा योजना मोदींच्या काळात कार्यान्वित झाल्या असून त्याचा कोट्यावधी लोकांना फायदा झाला आहे. एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना आणि जग जेव्हा मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकले आहे. संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यावेळी आपटे यांचे भाषण झाले