नागपूर : जंगलातील वाघांसह आम्ही राजकीय वाघांनाही स्थानांतरित करीत असून त्यांच्यासाठी रेस्क्यू सेंटर तयार केले आहे. तेथे राजकीय वाघांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपचार करीत आहेत, अशी उपरोधिक टीका राज्याचे पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. मुनगंटीवार बुधवारी नागपूर येथे विमानतळावर बोलत होते.
हेही वाचा – इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चुका, विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते संतापले असून, ते आयोग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर टीका करीत आहेत. शिंदे यांनी पक्ष आणि निवडणूक चिन्ह चोरले, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “राज्याचा पर्यावरण मंत्री म्हणून मी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांना नागझिरा-नवेगाव अभयारण्यात स्थानांतरित करने सुरू केले आहे. मागील ४० दिवसांत आम्ही ४० वाघांना स्थानांतरित केले. त्यांच्या उपचारासाठी ‘रेस्क्यू सेंटर’ तयार केले आहे. वाघ कुठलाही असो. मग तो जंगलातील असो किंवा राजकारणातला, त्याला स्थानांतरित केले जाईल. जे निवडणूक आयोगाच्या निर्णयाने घायाळ झाले त्यांच्यासाठी सुरू केलेल्या सेंटरमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर चांगला उपचार करीत आहेत, असे ते म्हणाले.