चंद्रपूर : येथील रघुनंदन लॉनमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी देशात जातीय द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. देशद्रोह्यांना बुडवायचा संकल्प करण्यासाठी एक सूर, एक ताल, एक विचार व एकच भाव ठेवावा लागेल. यासाठी महायुतीतील सर्वपक्षीय जिल्हास्तरीय समिती गठीत करावी, अशी सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
यावेळी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहर अध्यक्ष राजीव कक्कड, ग्रामीण अध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख बंडू हजारे, नितीन मत्ते, भाजप ओबीसी आघाडी उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह घटक पक्षाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीत सहभागी पक्षांची जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करावी, त्यामध्ये सर्व पक्षांच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश करावा. बूथचे योग्य नियोजन करा, कुणाला कितीही राग आला तरी पक्षावर राग काढू नका. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, पक्ष प्रवेश वाढवा. महायुती मर्यादित ठेवू नका. ४५ नाही तर ४८ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.
हेही वाचा – अमरावती लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा; महायुतीत बेबनाव
हंसराज अहीर यांनी बोलून दाखविले पराभवाचे शल्य
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात ग्रामपंचायतपासून पंचायत समितीपर्यंत, नगर पालिका, महापालिकांपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्वत्र भाजपची सत्ता होती. तरीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाला. दारूमुळे अथवा, जातीमुळे माझा पराभव झाला नाही, वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघात मला प्रचंड आघाडी होती. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व वरोरा-भद्रावती या चार विधानसभा मतदारसंघात बुथवर गडबड झाली का? मी कुणावर आरोप लावत नाही, मात्र पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे, अशा शब्दात मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पराभवाचे शल्य बोलून दाखवले.