लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अद्भुत आहे. असे नेतृत्व भारताला लाभणे हे आपले भाग्य आहे . अश्या महान नेत्यांचे कार्य राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमक्या शब्दांमध्ये ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे जे व्रत हाती घेतले आहे ते स्तुत्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर येथे केले.

वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार लिखित ‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

आणखी वाचा-वर्धेत भाजपच्या महाजनसंपर्क अभियानासाठी केंद्रीय मेंत्री अनुरागसिंग ठाकूर येणार, जाणून घ्या यामागील कारण

यावेळी व्यासपीठावर सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, आमदार संदीप धुर्वे,माजी मंत्री डॉ. परिणय फुके, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख,अतुल देशकर,संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, प्रमोद कडु, राजेंद्र गांधी,हरीश शर्मा, संध्या गुरनुले, राखी कंचर्लावार आदी उपस्थित होते.

अनेक कार्यकर्त्यांच्यासोबत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे आणि रमेश राजुरकर यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. त्यांचेही मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जगातील अनेक देश देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतापुढे झुकत आहेत. आयुष्यमान भारत योजना जगातील सर्वोत्तम मानली जात आहे. एम्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची संख्याही भक्कम झाली आहे असे मुनगंटीवार म्हणाले.

आणखी वाचा- “विरोधक देशासाठी नव्हे ‘परिवार बचाव’साठी एकत्र”, पाटण्यातील सभेवरुन फडणवीसांची टीका; म्हणाले…

मुद्रा योजना, स्टॅन्डअप योजना, स्टार्टअप योजना आदी अनेक योजना मोदी यांनी यशस्वी करून दाखविल्या. ज्या काश्मिरात आधी बॉम्बगोळे फेकले जात होते. त्याच काश्मिरातील लाल चौकात आता तिरंगा शानदारपणे फडकत आहे. देशाच्या विकासासाठी मोदी यांच्या पाठिशी जनता ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे नमूद करीत मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. या आणीबाणीच्या काळात देशाला खिळखिळे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आता देशाला भयमुक्त करण्याचे काम मोदी यांनी केल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे केले आभारप्रदर्शन भाजपा महामंत्री महानगर रवींद्र गुरुनुले यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar explain modis work in the exact words says devendra fadnavis rsj 74 mrj