चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वाराच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या प्रवेशद्वाराच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रवेशद्वाराचा शुभारंभ करण्यात आला.

मुनगंटीवार म्हणाले, पर्यटकांच्या आनंदासाठी तसेच तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे. पावसामुळे ताडोबा येथील गाभा क्षेत्रात प्रवेशबंदी असते. मात्र, बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ही चिंतेची बाब आहे. विधिमंडळ अधिवेशनात एक कायदा येणार असून त्यानुसार वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे.

हेही वाचा – पोलिसांच्या वेतनात वृद्धी पण पदोन्नतीत विषमता कायम! आश्वासित प्रगती योजनेबाबत कर्मचाऱ्यांची नाराजी

जंगलालगतच्या गावांच्या बाजूला दोन किलोमीटरवर कुंपण टाकून वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून रोखण्याचे नियोजन करता येईल का, यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या शिकारप्रकरणी बावरिया टोळीचे १६ जण ताब्यात

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून २५ लाख रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar inaugurated the somnath safari tourist gate in tadoba rsj 74 ssb