चंद्रपूर: महाराष्ट्रात ‘मिशन ऑलिम्पिक’ची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून होत आहे. २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तथा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रपरिषदेत दिली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध क्रीडापटूंनादेखील पाचारण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… … तर उसाच्या दरात बांबूची विक्री; नितीन गडकरी असे का म्हणाले?

नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी विनय गौडा, क्रीडा अधिकारी अविनाश पुंडे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची माहिती दिली. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘मिशन ऑलिम्पिक’च्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे. ‘मिशन शौर्य’ची सुरुवात चंद्रपुरातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून केली होती. त्यातूनच प्रेरणा घेऊन ‘मिशन ऑलिम्पिक’चा शुभारंभ चंद्रपुरातून केला जात आहे. स्पर्धकांना ताडोबाची मोफत सफारी घडवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण २० मैदानी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चौदा समित्यांचे गठन केले असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

क्रीडास्पर्धेत देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास ३ हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी सहभागी होणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने भव्य स्टेडियम

नवीन चंद्रपूर येथील म्हाडा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने भव्य स्टेडियम बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहे. आता केवळ जागेची प्रतीक्षा आहे. देशातील पहिले इनडोअर पारंपरिक खेळाचे क्रीडांगण एसएनडीटी विद्यापीठाच्या परिसरात उभारले जाणार आहे. ३०० वर्षात लोप पावलेले क्रीडा व पारंपरिक खेळ येथे खेळले जाणार आहेत. तसेच नेमबाजी, कुस्ती व कबड्डीचे क्रीडांगणही चंद्रपुरात उभारले जाणार आहे. यासाठी आदिवासी विभागाने निधी देण्याचे मान्य केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar informed that mission olympics is starting from chandrapur district in maharashtra rsj 74 dvr