नागपूर : काँग्रेसला सरकार येण्याची खात्री नसल्यामुळे खोटा जाहीरनामा दिला आहे. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला विरोध केला, आता जाहीरनाम्यात तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली. काँग्रेसची सध्याची स्थिती ‘चाची -४२०’ प्रमाणे झाली आहे, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. कॉंग्रेसचा जाहीरनाम हा खोटेनामा आहे. त्यांनी जातीनिहाय जनगणना करू असे जाहीर केले. मात्र राज्य सरकारला जनगणना करता येते का ? जाहीरनाम्यात सर्वच खोटी आश्वासने देण्यात आली आहे. महाविकास आघाडी जाती जातीमध्ये विष पसरवत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
काँग्रेस नेते लाडकी बहीण योजनेवर सातत्याने टीका करीत आहे. मात्र जाहीरनाम्यात या योजनेचा समावेश केला. रक्कम वाढवली आहे. मुळातच महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही, हे त्यांच्या मनातील आकडे आहे. आम्ही पंधराशे दिले तर त्यांनी तीन हजार जाहीर केले. आम्ही तीन हजार करु तर आठ हजार सांगतील. काँग्रेसमध्ये केवळ आकडेबहाद्दर असल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा – या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हाच्यामध्ये फरक आहे. खासदार उदयनराजे भोसले कधी कधी बोलताना तर्क देतात. पिपाणीला जास्त मते मिळाली हा तर्क योग्य नाही, ते बहुधा गंमतीत बोलले असतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेसचे पंतप्रधान असताना अनेक पूल पडले, रेल्वे अपघात झाले आहे. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्वाधिक अपघात, महिलावरील अत्याचार वाढले अशी टीका केली होती. मात्र कोणाचा पायगुण चांगला आणि कोणाचा वाईट हे जनता ठरवेल. हरियाणामध्ये काँग्रेस पराभूत झाली तर राहुल गांधी यांचा पायगुण चांगला नव्हता का ? असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार यांनी जेव्हा केव्हा राज्यात आणि देशात पन्नास वर्षांनी सत्ताबदल होईल तोपर्यंत त्यांनी राहावे. नवीन पिढीकडे त्यांनी नेतृत्व सोपवण्याची गरज आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहो आणि उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आम्ही करतो. वय झाल्यानंतर माणसाला असं वाटते की या सगळ्यांपासून दूर राहावे पण आमच्यावर त्यांचा एवढा राग का आहे हे कळत नाही. आम्हाला हटवल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणतात. याचेच आश्चर्य आहे असेही मुनगंटीवार म्हणाले.