२१ व्या शतकात रंगभूमी ही लोकाश्रयाच्या अधीन आहे. सरकार म्हणजे राजाश्रय हवाच आणि तो उत्तम आणि आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीतून दिला जाणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी, या क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी नाते असलेल्या सर्वांना शुभेच्छा देत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयी सुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत दोन्ही बाजूचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी अशी माझी इच्छा असून राज्याचा सांस्कृतिक विभाग त्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यातील अनेक नाट्यगृहाची अवस्था बिकट आहे हे मान्य आहे. त्याला सरकारी अनास्था देखील कारणीभूत आहे. त्यावर तोडगा म्हणून नाट्य मंदिराचे नाट्यचित्र मंदिर करता येईल का, यावर देखील विचार सुरू आहे. नाट्यगृह बांधताना किंवा नूतनीकरण करताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>>पोलीस हवालदारांची पदोन्नती अखेर मार्गी
ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. राज्यातील ३२ पैकी रवींद्र नाट्यगृह सांकृतिक विभागाकडे असून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. यासंदर्भातील अडचणी दूर करून नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना देऊन या संदर्भातील तज्ज्ञ व कलावंत यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करताना नाट्यगृहांमध्ये सोलर, एअर कंडिशन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, नाट्यगृहाच्या खुर्च्या, मेकअप रूम, प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, पार्किंग या सगळ्या बाबींचा समावेश असणे आवश्यक असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. हौशी कलावंतांना नाट्यगृह उपलब्ध व्हावेत असाही प्रयत्न असणार आहे. नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांना मानधनात वाढ करण्याचा निर्णय आणि स्पर्धेतील विजेत्या संघातील प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
हेही वाचा >>>भंडारा : ‘टी-१३’ वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एक जाणवले की मराठी माणूस हा नाट्यप्रेमी आहे. राज्य नाट्य स्पर्धा् असो की पुरुषोत्तम या महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा असो की गणपती उत्सवाच्या दरम्यान शहरातील विविध भागात होणारे नाट्यप्रयोग असो, हजारो मैल लांब असलेला मराठी माणूस येथील मराठी नाटकांवर लक्ष ठेवून असतो. येथील कलावंतांना व नाटकांना विदेशात आमंत्रित केले जात असून तेथेही गर्दी होत असते. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात जिथे ज्ञानार्जन हे हातातील मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. ओटीटी माध्यमांनी पर्यायाची खिडकी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अशा वातावरणात नाट्यकर्मींना प्रेक्षक खिळवून ठेवताना कसरत करावी लागणार असल्याचे ते म्हणाले”