चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचा ‘ठाण्या वाघ’ आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फायर ब्रॅण्ड’ नेते आहेत, अशा शब्दात राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही नेत्यांवर स्तुतीसुमने उधळली. हे पाहून शिंदे, फडणवीस आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनीही ६७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुनगंटीवार यांचे तोंडभरून कौतुक केले.
विसापूर येथील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या भाषणादरम्यान पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख ठाण्याचा ठाण्या वाघ असा केला. ठाण्याचा वाघ आज चंद्रपूर या वाघांच्या भूमीत आला आहे. याचबरोबर, उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील फायर ब्रॅण्ड नेते आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. हे ऐकून मुख्यमंत्री शिंदे यांनीही विसापूरसारख्या गावात ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मुनगंटीवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर स्तुतीसुमने उधळली. उपमुख्यमंत्री फडणवीस व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीदेखील मुनगंटीवार यांचे कौतुक केले.