चंद्रपूर: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अर्थ संकल्पात देशातील ५० पर्यटन स्थळांच्या विकासाची घोषणा केली आहे. यामध्ये जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश व्हावा, यासाठी माजी अर्थ, वन मंत्री भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.शंभर पेक्षा अधिक वाघांचे वास्तव्य असलेल्या या प्रकल्पाचा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे पत्रातून मांडला आहे. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश आले तर ताडोबाच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.
या जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर प्रसिध्दीस आले ते ताडोबा प्रकल्पामुळे. येथील वनवैभव, प्राचीन वारसा, खनिज संपत्तीने जिल्ह्याच्या वैभवात भर घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना लिहिलेल्या पत्रात मुनगंटीवार यांनी म्हटले आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११ हजार ४४३ चौ.कि.मी आहे. त्यात पाच हजार दहा चौ. कि.मी क्षेत्र वनसमृद्ध आहे. २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. ६२५.४० चौ.कि.मी क्षेत्राला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. ५०९.२७ चौ.कि.मी क्षेत्र संरक्षित आहे. देशात सर्वाधिक वाघांची संख्या चंद्रपुरात आले. ताडोबा व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न आहे. या व्याघ्र प्रकल्पातील ७९ टक्के क्षेत्र बांबू व्याप्त आहे. वाघांसोबतच इतर श्वापदांची संख्या येथे मोठी आहे. सन २०२१ पासून ताडोबा आणि परिसरातील गावांना प्लास्टिक मुक्त केले आहे. पर्यटकांसाठी येथे उद्यावत सुविधा आहे. ६० खासगी रिसार्ट आहे. सोबतच स्थानिक रहिवासी होमस्टेच्या माध्यमातून पर्यटकांना माफक दरात निवासाची सोय उपलब्ध करुन देतात.
यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष १० ते १५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे, असे आमदार मुनगंटीवार यांनी पत्रात नमुद केले आहे. येथे ३०० पेक्षा अधिक पक्षी प्रजाती आहेत, १७४ फुलपाखरू, ५४ सरीसृप प्रजाती, ६७० वनस्पती, ६० पेक्षा अधिक गवताच्या जाती, अंधारी नदी प्रकल्पातून जाते, बिबट्या, जंगली कुत्रे, भालु, गौर, सांभर, चितळ, भेकर, निलगाय याचेही वास्तव्य आहे. काळ्या बिबट्याचे अस्तीत्व आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावात मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय)चा वापर केला जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळच श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी निसर्ग उद्यान आहे. चंद्रपूरची आराध्य दैवद माता महाकालीचे मंदिर येथे आहे. हे मंदिर संरक्षित स्थळांच्या यादीत आहे. यासोबत एेतिहासिक वास्तू, प्राचीन लेणी, गोंडकालीन किल्ले, हेमाडपंथी मंदिर आदींना हा जिल्हा समुद्ध आहे. जिल्हयाचे वनवैभव, प्राचीन, एेतिहासिक, धार्मिक वारसा लक्षात घेता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश ५० पन्नान पर्यटन स्थळांच्या यादी समावेश करावा. त्यामुळे ताडोबाचे वैभव आणखी वाढले, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
पाच वर्षात १५ लाख ५८ हजार पर्यटकांची भेट
सन २०१९ ते २०२५ (आतापर्यंत) १५ लाख ५८ हजार १६७ पर्यंटकांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिला आहे. यात १९ हजार १८३ विदेश पर्यटक आहे. देशविदेशातील ख्यातनाम व्यक्ती दरवर्षी मोठ्या संख्येत या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येत असतात.