लोकसत्ता टीम
चंद्रपूर : ‘जाणता राजा’ महानाट्याच्या प्रयोगाला काही तासांचा अवधी शिल्लक असतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व स्थानिक आमदार किशोर जोरगेवार समर्थकांमध्ये स्वागतद्वार लावण्यावरून राजकीय नाट्य सुरू झाले आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक स्वागतद्वार लावण्यावरून समोरा समोर आले. यावेळी समर्थकांमध्ये वाद झाल्याने जाणता राजा महानाट्या प्रमाणेच राजकीय महानाट्य चर्चेत आले आहे.
सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक चांदा क्लब क्रिडांगण येथे जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सर्वत्र जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आयोजिले आहे. सर्वत्र या महानाट्याचे प्रयोग शांततेत होत असतांना चंद्रपूर शहरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांमध्ये राजकीय महानाट्य सुरू झाले आहे.
त्याचे झाले असे की, चांदा क्लब क्रिडांगण येथे जाणता राजा महानाट्य होत आहे. याच क्रिडांगणाच्या अगदी समोरच्या रस्त्यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी महानाट्याला येणाऱ्या रसिकश्रोत्यांचे स्वागत करणारे स्वागतद्वार उभे केले आहे. या स्वागतव्दारावर शिवाजी महाराज यांच्या मोठ्या छायाचित्रासह आमदार जोरगेवार यांचे छायाचित्र तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तथा सांस्कृतिक मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे छायाचित्र आहे. विशेष म्हणजे स्वागतद्वार महापालिकेची परवानगी घेवून लावण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार जोरगेवार यांच्या स्वागतद्वारच्या अगदी समोर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत प्रवेशद्वार लावण्यासाठी आज सकाळी भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, महानगर अध्यक्ष राहुल पावडे व समर्थक दाखल झाले.
आणखी वाचा-ईपीएस वाढीव पेन्शनसाठी महाराष्ट्रात प्रतीक्षाच, निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप ‘डिमांड’ नाही
समोरासमोर स्वागतद्वार नको म्हणून जोरगेवार समर्थकांनी यावर आक्षेप नोंदविला. यावरून मुनगंटीवार व जोरगेवार समर्थक आपसात भिडले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मुनगंटीवार व जोरगेवार समर्थकांमध्ये यापूर्वी आझाद बगीच्या लोकार्पण तथा अन्य कार्यक्रमात चकमक उडाली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतांना पुन्हा हे राजकीय महानाट्य झाल्याने या वादाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार जोरगेवार यांच्याकडून हा प्रकार मुद्दाम केला जात असल्याचा आरोप केला आहे तर जोरगेवार समर्थकांनी रितसर परवानगी घेवूनच स्वागतद्वार उभारले असल्याचे सांगितले.