चंद्रपूर: महाराष्‍ट्रात पुढील निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्‍यास मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्‍कम वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करीन असे उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्‍हणाले दोन लाख ८१ हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये टाकताना मला अतिशय आनंद झाला. कुठल्याही जातीची असो धर्माची असो रंगाची असो याचा विचार न करता महाराष्ट्रातील सर्व बहिणींना पंधराशे रुपये महिना मिळावे, या दृष्टीने सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. या वेळी मंचावर भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपा ग्रामीण जिल्‍हा अध्‍यक्ष हरीश शर्मा, बल्‍लारपूर शहर महिला भाजपा अध्‍यक्ष वैशाली जोशी तथा महिला भाजपा पदाधिकारी उपस्थित होत्‍या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Raj Thackeray: “हे सरकार वेळ मारून नेणारे”, शिंदेंना वारंवार भेटणारे राज ठाकरे पहिल्यांदाच…

आधी १७ ऑगस्‍टला पैसे टाकावे असा सरकारचा विचार होता परंतु इतक्या सर्व बहिणींच्या खात्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एवढे पैसे जमा होण्यास त्रास होईल या विचाराने १५ ऑगस्ट पासून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला व हळूहळू तो पूर्णत्वाला नेण्याचा आनंद आम्हाला झाला आहे. हा आमच्या भगिनींच्या हक्काचा पैसा आहे आणि हा त्यांना मिळायलाच हवा या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाला याचाही मला अतिशय आनंद आहे. ज्या बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित असतील त्या सर्व बहिणींनी अजूनही फॉर्म भरावा. ३१ ऑगस्टपर्यंत ज्या बहिणी फॉर्म भरतील त्यांना जुलै व ऑगस्टचे पैसे एकत्रितपणे मिळतील. ज्या बहिणी ३१ ऑगस्ट पर्यंत ही फॉर्म भरू शकणार नाही त्यांनी सुद्धा चिंता करू नये त्यांचा हा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना यातील प्रत्येक भगिनीला मिळेल याची खात्री मी देतो. मी चंदनसिंग चंदेल हरीश शर्मा व त्यांच्या संपूर्ण चमुचे इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करतो. आणखी एका गोष्टीबद्दल चंदनसिंग चंदेल यांचे मी कौतुक करतो संपूर्ण महाराष्ट्रात फक्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बूथ प्रमुख म्हणून एका पुरुषाबरोबर एका महिलेची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar to increase amount of ladki bahin yojana if mahayuti forms government again rsj 74 css