लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत कुणी-कुणी विरोधात काम केले, याची यादी मला एका कार्यकर्त्याने आणून दिली. ती यादी आपल्या विरोधी उमेदवाराच्या कार्यालयातून गुप्तपणे आली, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते तथा वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ‘ती’ यादी पाहून मी संतापलो नाही. कारण, हाताला जखम झाली तर हात तोडायचा नसतो. दिशा चुकली म्हणून दशा करायची नसते. अशा लोकांची मी स्वतंत्र बैठक घेईन, त्यांना ‘इंजेक्शन’ नक्की देईन. औषध लागत नाही, असे लक्षात येईल, तर ‘ऑपरेशन’ करणे गरजेचे राहील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपच्या जिल्हा महाअधिवेशनात मुनगंटीवार बोलत होते. मुनगंटीवार यांच्या विधानाने काँग्रेसच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली असून हालचाली सुरू झाल्या आहेत. अतिशय गोपनीय कागदपत्रे घेऊन जाणारा ‘तो’ गुप्तहेर कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आणखी वाचा-नागपूर : अधिकाऱ्यांच्या हाती झाडू अन् महिलांच्या हाती पोछा

या महाअधिवेशनात मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत दगाफटका करणाऱ्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामधील अंतर्गत कलह अधिक तीव्रतेने पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. गद्दारांची यादी आपल्याकडे आहे, या मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने दगाफटका करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडावरचे पाणी नक्की पळाले असेल.

महाविकास आघाडी सुडाने पेटली

महाविकास आघाडीचे सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही. पण आलेच तर महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा ‘फेसबूक लाइव्ह’ मुख्यमंत्री येतील. महाविकास आघाडीमध्ये सगळेच मंत्री एकच विभाग मागतील. हा विभाग असेल ‘जेल विभाग’. हे सगळे लोक याला ‘जेल’मध्ये टाक, त्याला ‘जेल’मध्ये टाक, या सुडाने पेटलेले आहे. त्यामुळे ‘जेल’ हा एकच विभाग महाविकास आघाडीमध्ये काम करणारा असेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

आणखी वाचा-धक्कादायक : खाटेची कावड करून गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवले; पण बाळ दगावले

लोकांपर्यंत सत्य पोहोचवा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येताच विरोधकांना सरकारच्या तिजोरीची चिंता वाटत आहे. जनतेचा पैसा जनतेलाच देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. औरंगजेबाची बाजू घेणाऱ्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेस धडपड करीत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकांशी खोटे बोलण्याचे पाप केले. महायुतीच्या सरकारने, केंद्रातील नरेंद्रजी मोदी सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या. या योजनांबद्दलही काँग्रेस भ्रम पसरवित आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.

मंचावरील नेत्यापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा

मंचावरील नेत्यापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, मंचावरील नेते जे करू शकत नाहीत ते साधारण कार्यकर्ता करून दाखवतो. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा, जीव की प्राण आहे. आजचा नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री भविष्यात माजी होऊ शकतो, मात्र कार्यकर्ता हा कधीच माजी होत नाही. कार्यकर्ता हा हनुमानासारखा चिरंजीवी आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

आणखी वाचा-अमरावती : ‘बच्‍चू कडूंनी उमेदवार मागे घेण्‍यासाठी पैसे मागितले’, आमदार रवी राणांच्या आरोपाने खळबळ

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व ग्रामीण भागात घराघरांत भेटी देऊन महाविकास आघाडीचा बुरखा फाडावा. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी मी पक्षाच्या सोबत आहे, असा विचार करणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. मी भाजपच्या अशा कार्यकर्त्यांसोबत आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते थोडे बाजूला गेले आहेत. त्यांची बैठक घ्यावी व एकत्र आणावे असेही मुनगंटीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwars statement created an uproar in the inner circle of the congress rsj 74 mrj