चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेंडकी शाखेत कार्यरत असताना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बडतर्फची कारवाई झालेल्या अमित राऊत (४५) याने फाशी लावून व त्यानंतर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत्युशी झुंज देत असलेल्या राऊत याच्यावर नागपुरात खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आत्महत्येपूर्वी राऊत याने पत्नीच्या नावे एक चिठ्ठी लिहिली असून त्यात बँकेच्या पदाधिकारी, संचालक व अधिकाऱ्यांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा बँकेच्या मेंडकी शाखेत २०२१ मध्ये मृतकांच्या नावे असलेल्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याची बाब उघडकीस आली होती. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मेंडकी शाखेतील अमित राऊत, अमित नागापुरे, संजय शेंडे, यशराज मसराम तथा भोयर या पाच कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा – वर्धा : कोण होणार हिंदी विद्यापीठाचे नवे कुलगुरू?
या प्रकरणाची चौकशी बँकेचे सहायक व्यवस्थापक मंगल बुरांडे व डोंगरवार यांनी केली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांना पाचही कर्मचारी दोषी असल्याचे चौकशीत आढळल्याने ही कारवाई केली. दरम्यान दोन वर्षांपासून हे आर्थिक प्रकरण सुरू असतानाच मंगळवार ५ डिसेंबर रोजी बँकेचे बडतर्फे कर्मचारी अमित राऊत याने सुरुवातीला घरी गळफास लावून घेतला. मात्र पतीने गळफास लावल्याचे पत्नीच्या निदर्शनास येताच त्याचा जीव वाचविण्यात यश आले. परंतु त्यानंतर अमितने घराच्या बाहेर विष प्राशन केले. यात अमितची प्रकृती गंभीर झाली. त्याला चिंताजनक स्थितीत नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथे तो मृत्यूशी झुंज देत आहे.
दरम्यान, या प्रकरणात चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही असे म्हणत अमितने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीकडे एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत बँकेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.