नागपूर : गावात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमसंबंधाला कुटुंबियांनी विरोध केला. त्यामुळे नैराश्यातून गावातील पडक्या घरात एकाच दोरीने दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात उघडकीस आली. गौरव बगमारे (वय १९) व जान्हवी (वय १९) अशी मृत प्रेमीयुगुलांची नावे आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव बगमारे हा सावनेर येथील आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिकचे प्रशिक्षण घेत होता. तर जान्हवी ही पारशिवनीतील हरीहर महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. दोघेही एकाच शाळेत शिकत असल्याने त्यांची मैत्री होती. त्यातूनच त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची गावाभर चर्चा असल्यामुळे त्याची कुणकुण कुटुंबियांना लागली होती. त्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांची समजूत घालून दूर राहण्यासाठी तंबी दिली होती. त्यामुळे काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
हेही वाचा – भाजी विक्रेत्याने बाजारातून चोरल्या तब्बल ३१ दुचाकी! मध्यप्रदेशात कवडीमोल भावाने विक्री
हेही वाचा – घरबसल्या काम करत नफा कमावायला गेली आणि लग्नासाठी जमवलेली रक्कम एका क्लिकवर गमावली
प्रेमी युगुलांना एकमेकांचा विरह सहन होत नव्हता. त्यामुळे ते दोघेही चोरून-लपून भेटत होते. मात्र, दोघेही कुटुंब आणि समाजाच्या विरोधाला कंटाळले होते. सोबत जगता येत नसले तरी सोबत मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय गौरव-जान्हवी यांनी घेतला. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत दोघेही मोबाईलवर चॅटिंग करीत होते. शेवटी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही घराबाहेर पडले. एका पडक्या घरात गेले. त्यांनी शेवटची भेट समजून अलिंगन घेतले. त्यानंतर एकाच दोरीच्या दोन टोकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना गावकऱ्यांमुळे उघडकीस आली. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.