नागपूर : बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. वानाडोंगरी परिसरात ही घटना घडली असून परीक्षेच्या महिन्याअगोदर त्याने असे पाऊल उचलल्याने अभ्यासाचा तणाव यामागे होता की काय या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
रियान मोहम्मद रियाझ खान (वय १७) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी होता व शिकण्यासाठी नागपुरात आला होता. एका कनिष्ठ महाविद्यालयात दाखला घेतल्याने तो युवर स्पेस ऑनलाइन कंपनीच्या वसतिगृहामध्ये राहत होता. एप्रिल २०२४ पासून तो तेथे राहत होता. त्याच्यासोबत आणखी दोन विद्यार्थीदेखील रहायचे. सोमवारी सकाळी ते दोघे महाविद्यालयात गेले, मात्र रियान वसतिगृहातच थांबला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो एकटाच वसतिगृहाच्या गच्चीवर गेला व तिथे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ उभा राहून खाली उडी मारली.
हेही वाचा – बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
मोठा आवाज आल्याने सुरक्षारक्षक व वॉर्डन खाली पोहचले तर रियान जखमी अवस्थेत पडला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली, मात्र कुठेही सुसाईड नोट सापडली नाही. त्याने आत्महत्या का केली हे अद्यापही कळू शकलेले नाही. बारावीची परीक्षा पुढील महिन्यात आहे. त्याअगोदर त्याने हे पाऊल उचलल्याने परीक्षेचा तणाव होता का या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत. रियान हा काही दिवसांपासून एकटाच विचारात गुंग राहायचा. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येदेखील तो घरी गेला नव्हता अशी माहिती वसतिगृहातील काही मुलांनी दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा – शेगावातील केसगळतीची रुग्णसंख्या १४९ वर, भयाची व्याप्ती वाढली
वडील परदेशात, आईला मानसिक धक्का
रियानचे वडील परदेशात नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी त्याच्या आईला संपर्क करून नागपुरात बोलावून घेतले. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच आईला मोठा मानसिक धक्का बसला असून ती काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याची माहिती ठाणेदार महेश चव्हाण यांनी दिली.