यवतमाळ : आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेने आपल्या मुलांना घरात कोंडले.  त्यानंतर ‘मी विहिरीत जीव द्यायला चालली’, असे सांगून घरातून निघाली. अखेर महिलेचा मृतदेहच विहिरीत आढळला.  यशोदा गंगाराम गरड (३०) रा. इंदिरानगर उमरखेड, असे मृत महिलचे नाव आहे. या घटनने खळबळ उडाली आहे.

तिचा पती हा स्टेशनरी साहित्य विक्रीसाठी हदगाव (जि. नांदेड) येथे गेला होता. यशोदा दुर्धर आजाराने त्रस्त होती. त्यामुळे तिला शुक्रवारी सायंकाळी वर्धा येथे उपचारासाठी नेण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच महिलने आपल्या तिन्ही मुलांना घरात कोंडले. त्यांना आपण विहिरीत जीव द्यायला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे मुलं घाबरली. त्यांनी आरडाओरड केली. मोठी मुलगी आराध्या हिने आपल्या काकांना फोनद्वारे ही माहिती दिली. महिलेच्या दिराने तत्काळ भावाचे घर गाठून मुलांची घरातून सुटका केली. त्यानंतर  महिलेचा गावात सर्वत्र शोध सुरू केला. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात एका पडीक विहिरीत  मृतदेह आढळला. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहे.

यवतमाळचा तरुण ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीत बुडाला

मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथील तरूणाचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाला. दिनेश अमोल कदम (२०), असे मृताचे नाव आहे. पोहंडूळ येथील दिनेश अमोल कदम व मंगेश अमोल कदम हे दोन भाऊ मित्रांसमवेत ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेण्याअगोदर गुरूवारी सायंकाळी ते नर्मदा नदीच्या नागर घाटावर आंघोळीकरीता नदीपात्रात उतरले. त्याचवेळी अचानक जलस्तर वाढल्याने दिनेश गंटागळ्या खाऊ लागला. त्याच्या मदतीसाठी भाऊ मंगेश धावून गेला, मात्र तोही गटांगळ्या खाऊ लागला. दोघेजण बुडत असल्याने मित्रांनी आरडाओरड केल्याने स्थानिक नावाडी आणि होमगार्ड मदतीस धावले. त्यांनी मंगेशला पाण्याबाहेर काढले. दिनेशचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकारेश्वर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी दिनेशचा मृतदेह पोहंडूळ येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनेश व मंगेश ही पोहंडूळच्या सरपंच ज्योती अमोल कदम यांची मुले आहेत. या घटनेने पोहंडूळ गावात शोककळा पसरली आहे.