नागपूर : ड्रग्स घेण्याची सवय लागल्यानंतर ते मिळविण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणाऱ्या युवकाने स्वत:चे जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना विश्व अंमली पदार्थ विरोधी दिवसाच्या पहाटेलाच घडली. अन्नू गुप्ता (२४) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नू याच्या वडिलाचा इतवारीत फुटाणे, पोहे आणि मुरमुरे विक्रीचा व्यवसाय आहे. बारावी झाल्यानंतर तो वडिलाच्या व्यवसायात हातभार लावत होता. त्याला ड्रग्स आणि दारुचे व्यसन लागले. तो ड्रग्स मिळविण्यासाठी पैसे खर्च करीत होता. कुटुंबियांनी त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र, ड्रग्स मिळत नसल्याने तो नैराश्यात गेला. अन्नूने रविवारच्या एक वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘सॉरी मम्मी-पप्पा, मी ड्रग्स आणि दारुच्या आहारी गेलाे. याचा पश्चातापही होत आहे. आता मला जगण्याची इच्छा नाही. मी तुम्हाला सोडून जात आहे.’ अशी चिठ्ठी लिहून अन्नूने गळफास घेऊन आत्महत्या केली. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.