शेतकरी आत्महत्या हा परवलीचा शब्द झाला असताना शेतकऱ्यांपेक्षाही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये अकुशल शेतमजुरांची संख्या जास्त असल्याचे एका अभ्यासाअंती दिसून आले आहे. विदर्भातील दोन जिल्ह्य़ांमधील ४० गावांमध्ये केलेल्या एका अभ्यासात जानेवारी २०१२ ते जुलै २०१५ मध्ये ७१ जणांनी आत्महत्यांचा प्रयत्न केला, तर ५६ जणांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. २०१२मध्ये १० जणांनी आत्महत्यांचा प्रयत्न केला तर ९ जणांनी आत्महत्या केल्या. २०१३ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे २४–२३ असे होते. २०१४ मध्ये २५–१९ आणि २०१५मध्ये १२–५ असे आहे.
आत्महत्या किंवा ती करण्याचा प्रयत्न एकाएकी मनात येत नाही. ते करण्यामागे बरीच मोठी मानसिक घालमेल आणि पाश्र्वभूमी असते. आश्चर्य म्हणजे आत्महत्येची आकडेवारी शासकीय दस्तऐवजात दिसून येते तशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. अशा या महत्त्वपूर्ण अभ्यासाला टाटा ट्रस्टने अर्थसहाय्य केले असून विदर्भ स्ट्रेस अॅण्ड हेल्थ प्रोग्रॅम (व्हीएसएचपी) म्हणजेच ‘विश्राम’ या गोव्यातील संस्थेने कार्यक्रमाची आखणी केली. त्यांनी या उपक्रमांतर्गत केवळ आत्महत्यांचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाची सांख्यिकी गोळा केली नाही तर त्यांचे समुपदेशन करून ताणतणाव किंवा निराशेच्या गर्तेतील लोकांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि लोणारा येथील प्रकृती संस्थांनी तळागाळात काम केले.
आत्महत्या आणि आत्महत्येच्या प्रयत्नांमागे कौटुंबिक कारणे असून त्याला शेतीतील नापिकी, कर्ज, आर्थिकवाद याची किनार असते. विद्यार्थी, शेतकरी, शेतकरी व शेतमजूर, अकुशल मजूर, गुरे सांभाळणारा आणि कुशल कामगार यांच्यात हे प्रमाण पाहिल्यास अकुशल शेतमजुरांनी आत्महत्यांचा प्रयत्न मोठय़ा संख्येने केला आहे. चार विद्यार्थ्यांनी, १८ शेतकऱ्यांनी, शेतमजुरी करणाऱ्या १० शेतकऱ्यांनी, ३८ अकुशल मजुरांनी आणि कुशल काम किंवा सेवा करणाऱ्यांपैकी केवळ एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
(पूर्वार्ध)
या संदर्भात विश्रामचे मध्यस्थ संचालक सिद्धार्थ गांगले म्हणाले, ताणतणाव आणि निराशेतून होणाऱ्या आत्महत्यांचा नेमका शोध घेण्यासाठी विश्रामने अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव रेल्वे आणि चांदुरबाजार या दोन्ही तालुक्यांतून प्रत्येकी १५ गावे तर वर्धा जिल्ह्य़ातील आर्वी तालुक्यातील १० गावांची अशी ४० गावांची निवड करून आत्महत्याग्रस्त घरांचा शोध घेतला. त्यात अकुशल मजुरांमध्ये शेतकऱ्यांपेक्षाही आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. अर्थात अर्धा, पाऊण, एक एकर जमीन असणारे शेतकरी स्वत:ची शेती करून नंतर इतरांच्या शेतावर शेतमजुरी करायला जातात. आत्महत्यांच्या प्रयत्नांमागे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आर्थिक कारण असते.