यवतमाळ : शिक्षकांनी मनावर घेतले तर शाळा, विद्यार्थी आणि गावाचा लौकीक कसा वाढतो, याचे उत्तम उदाहरण कळंब तालुक्यातील सुकळी या गावात बघायला मिळते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी ही दोन शिक्षकी आणि ४१ विद्यार्थी संख्या असलेली शाळा. परंतु, भौतिक साधन सुविधांची उपलब्धता, त्याचा परिपूर्ण उपयोग आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता या कसोटीवर सुकळी शाळेने ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांकाचे ११ लाख रूपयांचे बक्षीस पटकाविले.
शाळेच्या इमारतीवरून गुणवत्ता सिद्ध होत नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक कसे घडवितात, यावरून ही छोटी शाळा आदर्श ठरली आहे. सुकळी हे गाव आडवळणावर आहे. गावगाड्याच्या राजकारणात गावातील शाळा ओस पडू लागली. मात्र २०१८ मध्ये येथे बदलून आलेल्या शिक्षकांनी स्वत:पासून सुरूवात करत शाळेला आणि गावालाही शिस्त लावली. शाळेचे मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि सहायक शिक्षक संदीप कोल्हे या शिक्षकांनी समन्वयातून शाळेत गुणवत्तापूर्ण बदल केले. गावातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जात असल्याने शाळेची पटसंख्या वाढविण्याचे आव्हान या शिक्षकांसमोर होते.
शिक्षकांनी गावकऱ्यांशी संवाद साधत मुलांना गावातीलच शाळेत टाकण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी त्यांना तुमची मुलं गावातील शाळेत टाकणार का, असा प्रश्न केला. तेव्हा दोन्ही शिक्षकांनी सर्वप्रथम आपल्या मुलांची नावे जिल्हा परिषद सुकळी शाळेत घातली आणि गावकऱ्यांना कृतीतून उत्तर दिले. गावकऱ्यांसाठी तो धक्का होता. त्याचा योग्य परिणाम झाला आणि ग्रामस्थांनी आपल्या मुलांची नावे गावातील शाळेत घातली. तेथून या शाळेचा कायापालट सुरू झाला. शनिवार, रविवार, सरकारी सुट्टीच्या दिवशी, उन्हाळ्याच्या सुट्टीतही वर्ग भरणारी ही जिल्ह्यातील एकमेव शाळा असावी.
शिक्षकांचे प्रयत्न, गावकऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द या जोरावर अल्पावधीतच सुकळी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता राज्यभर प्रसिद्ध झाली. दरवर्षी महादीप व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये येथील विद्यार्थी यशस्वी होतात. या शाळेचे विद्यार्थी जर्मन, जापानी, इंग्रजी भाषा लिहायला, बोलायला शिकले आहेत. विद्यार्थी ग्राहक भांडार, आनंदी मुलांची बचत बँक, नियमित तासिकांमध्ये ‘इनोव्हेशन टाईम’ नावाची तासिका, विद्यार्थ्यांद्वारे निर्मित, संपादित ‘ज्ञानरंजन’ मासिक, तारीख एक गणित अनेक, रचनात्मक परसबाग, फिरते मुक्त वाचनालय असे उपक्रम शाळेत सुरू आहेत. पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना २२ अंकी संख्यांचे वाचन सहज करता येते.
संविधान समजून घेऊ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संविधानातील १७७ अनुच्छेदांची माहिती समजून घेतली. तत्कालीन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून दिवसभर या शाळेत रमले होते. आता तर या शाळेमध्ये गावातील विद्यार्थ्यांबरोबरच कळंब, यवतमाळ व शेजारील गावांमधील विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रवेश घेतला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात मिळालेले ११ लाखांचे पहिले बक्षीस हे गुणवत्तेने परिपूर्ण असणारे उत्साही विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि गावकऱ्यांच्या परिश्रमाचे यश आहे, असे मुख्याध्यापक अमोल पालेकर यांनी सांगितले. या निधीतून शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.