सत्तेतून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर लोककल्याणासाठी करावा, असे नेहमी सांगितले जाते. सत्ता मिळवणारे राजकारणी सुध्दा जाहीरपणे हीच भाषा बोलत असतात. मात्र, राजकारणात बोलायचे एक आणि करायचे भलतेच असते. भाषा सामान्यांची करायची आणि गळेही त्यांचेच घोटायचे, असाच प्रकार आता सर्वत्र दिसू लागला आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मिळालेल्या ऊर्जेचे रूपांतर इतक्या लवकर उन्मादात होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. गेल्या आठवडय़ातील घटना बघितल्या तर साधनसुचितेच्या गप्पा मारणारा हाच का तो भाजप?, असा प्रश्न कुणालाही पडावा.
नवे सरकार आल्यावर राज्याच्या उपराजधानीतील गुंडगिरी मोडून काढली जाईल, असा अनेकांचा समज होता. प्रत्यक्षात या गुंडगिरीला संपवण्याऐवजी त्याला प्रोत्साहन कसे मिळेल, यासाठीच सत्तेचा उन्माद अंगी बाळगणारे भाजपचे नेते झटत असल्याचे दिसून येत आहे. सध्या गाजत असलेले एका प्राध्यापकाचे प्रकरण या नेत्यांच्या उन्मादाची साक्ष देणारेच आहे. गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे, त्यातही मोक्कासारखा गुन्हा दाखल असलेल्या सुमीत ठाकूर या गुंडाला भारतीय जनता युवा मोर्चात पद दिले जाते. या पदाच्या बळावर त्याच्या गुन्हेगारीला आणखी चेव चढतो. क्षुल्लक कारणांवरून एका दलित प्राध्यापकाची कार जाळण्यापर्यंत त्याची मजल जाते. तो सत्ताधारी असल्याने पोलीस गुन्हा दाखल करायला धजावत नाहीत. माध्यमांमधून गवगवा झाल्यावर हा उन्मादी गुंड फरार होतो. भयग्रस्त प्राध्यापक घर सोडतो. एखाद्या चित्रपटात घडावा तसा हा प्रकार आहे. मुंबईतील गुंडांना लाजवेल अशी या शहराची ही वाटचाल आहे व त्यात सत्ताधाऱ्यांची सक्रीयता अंतर्भूत आहे.
काही वर्षांंपूर्वीची गोष्ट आहे. याच उपराजधानीतील गुंडगिरीवरून हेच भाजप नेते आघाडी सरकारला धारेवर धरत होते. आता तेच नेते सत्ता मिळाल्यावर सुमीत ठाकूरला शहराचा उपाध्यक्ष करत असतील, तर भाजप इतरांपेक्षा वेगळा कसा? तेव्हा उठसूठ गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणारे व आता ही दोन्ही पदे भूषवणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? सुमीत ठाकूरला कुणाच्या सांगण्यावरून पक्षात घेण्यात आले व पद देण्यात आले?, हे भाजपचे नेते सांगतील काय? गुंड प्रत्येक शहरात असतात. त्यांचा प्रयत्न कायम सत्तेच्या वळचणीला चिकटून राहण्याचा असतो. हे खरे असले तरी अशांना थेट पक्षात पद दिले जात असेल तर गुंडांना कोण संरक्षण देत आहे, याचे उत्तर जनतेला सांगण्याची गरज नाही. त्यांना ते बरोबर कळते. सत्तेचा हा उन्माद केवळ राजकारणात सक्रीय असलेल्या गुंडापुरता मर्यादित नाही. आता या उन्मादाने वेगवेगळ्या क्षेत्रातही रंग दाखवायला सुरुवात केली आहे. विदर्भात दरवर्षी ख्रिश्चन धर्मीयांतर्फे प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. देशात कोणत्याही धर्माला अशा सभा आयोजित करण्याचा, धर्म प्रसाराचा व त्यामुळे प्रेरित होऊन कुणी तो धर्म स्वीकारीत असेल तर त्याला सामावून घेण्याचा अधिकार आहे. आता देश व राज्यात सत्ता येताच ख्रिश्चनांच्या या प्रार्थनासभा हिंदुत्ववाद्यांना खुपू लागल्या आहेत. उपराजधानीत आयोजित करण्यात आलेल्या या सभेत धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडू, असा इशारा बजरंग दलाने दिला. गेली १५ वष्रे राज्यात आघाडी सरकार होते तेव्हा हे बजरंग दल कुठे होते?, हे कळायला मार्ग नाही. तेव्हा असे इशारे देण्याची हिंमत या दलात नव्हती. कारण, या हिमतीला सत्तेचे संरक्षण मिळणार नाही, याची जाणीव दलवाल्यांना होती. असे पाठबळ नसताना कोणताही आगाऊपणा महागात पडेल, हे या पत्रकबाज हिंदुत्ववाद्यांना ठावूक होते. आता परिवाराची सत्ता येताच यांच्या डरकाळ्या सुरू झाल्या आहेत. ख्रिश्चनांच्या या सभा विदर्भात सर्वत्र होतात. त्यात ज्याला सहभागी व्हायचे असेल ते जातात. कायद्याच्या राज्यात यावर कुणाला आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. तरीही बजरंग दलाचे इशारे सुरू झाले आहेत. या सभेवर आम्ही लक्ष ठेवू, धर्मातराचा प्रयत्न झाला तर खपवून घेणार नाही, अशी कायदा हाती घेण्याची भाषा या दलाकडून जाहीरपणे केली गेली. त्यामुळे सभेचे आयोजक घाबरले होते.चोख बंदोबस्तामुळे काही घडले नाही तरीही वातावरण भयभीत करण्याचा अधिकार या सत्ताधाऱ्यांना कुणी दिला? राज्यातील जनतेने घडवून आणलेला सत्ताबदल यासाठी होता की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होता?, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
भयमुक्त वातावरणनिर्मिती ही कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते, त्याचाच विसर या शहराचे सुपूत्र असलेल्या गृहमंत्र्यांना पडला की काय, अशी शंका येथील घटना बघून आता यायला लागली आहे. सभ्य व सुसंस्कृत लोकांचा पक्ष, अशी ओळख या पक्षाचे नेते नेहमी करून देतात. आमच्यावर संघाचे संस्कार आहेत, असेही ते अभिमानाने सांगतात. संघ सुध्दा या पक्ष नेत्यांना प्रशिक्षित करण्यासाठी नेहमी अभ्यासवर्ग घेत असतो. या वर्गात गुंडांना संरक्षण कसे द्यायचे, हे तर नक्कीच शिकवले जात नसेल. मग नेमकी कोणती शिकवण या नेत्यांना दिली जाते?, असा प्रश्न या पक्षातील नेत्यांचे वर्तन बघून अनेकांना पडला आहे. सुमीत ठाकूरची हकालपट्टी केली व बजरंग दलाच्या इशाऱ्यावर कायदा आपले काम करेल, अशी साचेबध्द उत्तरे देऊन हे वातावरण निवळणारे नाही, याची जाणीव भाजपमधील कर्त्यांना आहे काय? १९९५ ला मिळालेली सत्ता या पक्षाने असाच उन्माद करून ५ वर्षांत घालवली व नंतरची १५ वष्रे सत्तेविना राहिले. हा अनुभव अवघ्या एका वर्षांत भाजप नेते विसरले की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. उन्माद वस्तुस्थितीची जाणीव विसरायला लावतो, याची कल्पना या पक्ष नेत्यांना येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
– देवेंद्र गावंडे
ताजा कलम
मांसाहाराला विरोध करणाऱ्या संघालाच मांसाहार वज्र्य नाही, अशी भूमिका मांडून संघाला अडचणीत आणणारे दिलीप देवधर यांचा स्तंभ संघाच्या मुखपत्राने बंद केला आहे. संघाच्या इशाऱ्यावरून ही बंदी लादल्याची चर्चा माध्यमवर्तुळात आहे.
सत्तेचा ‘संघीय’ उन्माद..
सत्तेतून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर लोककल्याणासाठी करावा, असे नेहमी सांगितले जाते.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 06-10-2015 at 08:05 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumeet thakur nagpur