नागपूर: शहरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूर हा अपहरण केल्याच्या गुन्ह्यात फरार आहे. मात्र, त्याच्या साथिदारांनी तक्रारदार युवकाच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार मागे घेण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून जरीपटका पोलीस ठाण्यात सुमित व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या फिर्यादीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात पोलिसांना अपयश आले. कुख्यात सुमित ठाकूर अजुनही पोलिसांना सापडला नाही, नागपूर पोलिसांचे अपयश आहे.
१६ ऑक्टोबरला रात्री सुमितने कमल नाईक आणि त्याच्या दोन साथीदारांचे जरीपटका येथील ठवरे कॉलनीतून पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले होते. त्यांना गाडीतून निर्जन स्थळी नेऊन मारहाण करण्यात आली व पैसे-मोबाईल लुटण्यात आले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी सुमितसह सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सुमित त्याच्या साथीदारांसह फरार आहे.
हेही वाचा… रस्ते नव्हे मृत्यूचे सापळे! एक बाजू पूर्ण, दुसरी अर्धवट, रस्त्यावरील चेंबर ही उघडेच!
२२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुमितच्या मित्राने कमलला फोन केला. त्याने कमलला ‘तू कुठे आहेस’ असे विचारले आणि महत्त्वाच्या कामासाठी भेटायला सांगितले. कमलने घरी असल्याचे सांगितल्यानंतर दोन जण त्याच्या घरी आले. एका आरोपीच्या कमरेला पिस्तूल होते. ‘सुमित भाईने आम्हाला पाठवले आहे, तो एक मोठा डॉन आहे, भाईविरोधात केलेली तक्रार परत घे, अन्यथा तुला गोळ्या घालून ठार करू’, असे त्याने कमलला सांगितले. या धमकीने कमल घाबरला. आरोपीने त्याला न्यायालयात जाण्यास सांगितले. न्यायालयात पोहोचल्यानंतर कमलने एका वकिलाची भेट घेतली. त्याने कमलला एक स्टॅम्प पेपर दिला व त्यावर सही करण्यास सांगितले.
हेही वाचा… “उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे”…. मुनगंटीवारांची मागणी
सही केल्यानंतर दोन्ही आरोपींनी कमलला ‘ही घटना कोणाला सांगू नकोस’ असे सांगितले. त्यानंतर कमलने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुमितने तक्रारदाराला धमकावल्याची घटना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्याने घेतली. गुरुवारी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याची माहिती आहे.