वर्धा : मोठ्या नेत्यांचे विश्वासू सचिव पुढे निवडणुकीच्या रिंगणात उतरून आमदार, खासदार झाले असल्याची उदाहरणे आहेत. महादेवराव शिवणकर यांचे सुबोध मोहिते, उद्धव ठाकरे यांचे मिलिंद नार्वेकर अशी व अन्य उदाहरणे आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू म्हणून ओळख असलेले सुमित वानखेडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तसेच फडणवीस यांचे स्वीय सचिव राहिलेले अभिमन्यू पवार हे विद्यमान आमदार असून ते आता दुसऱ्यांदा लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून उभे ठाकले आहे. त्यांना भाजपने परत संधी दिली आहे.

इकडे सुमित वानखेडे यांची विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्याशी स्पर्धा होती. केचे हे मीच लढणार असा जाहीर निर्धार व्यक्त करून चुकले होते. केचे यांनी तर आज अर्ज दाखल करीत फडणवीस यांनाच थेट आव्हान देऊन टाकले. केचे यांची तिकीट कापतानाच त्यांचा निर्धार मोडून काढण्याचा प्रकार सुमित वानखेडे यांच्यासाठी घडला. ९० टक्के आर्वी भाजप पदाधिकारी वानखेडे यांच्या पाठीशी तसेच जिल्हाध्यक्ष गफाट यांनी केचे यांचा अर्ज अधिकृत पक्षाचा नसल्याचा काढलेला फतवा, यामुळे वानखेडे हेच निश्चित होतील असे दिसून आले.

हेही वाचा – उमेदवारी अर्ज भरण्यास दोन मिनिंटाचा उशीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या….

कोण हे वानखेडे? तर मूळचे आर्वीकर असणारे व सध्या आर्वी येथील आपल्या जुन्या घरीच वास्तव्यास असणारे शिक्षणासाठी आर्वी सोडून बाहेर पडले. पूणे येथून त्यांनी बी. ई. मेकॅनिकल ही पदवी घेतली. या पदवीनंतर वानखेडे हे पूणे येथील एमआयटी संस्थेत पब्लिक पॉलिसी हा अभ्यासक्रम शिकण्यास गेले. विधिमंडळ कार्य या विषयाचे रिसर्च फेलो म्हणून कार्यरत असताना ते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आले. २०११ हे ते वर्ष होय. त्यावेळी फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. मात्र, त्यावेळी झालेली ओळखी पुढे कायमची घट्ट झाली.

फडणवीस यांचा सर्वाधिक विश्वास वानखेडे यांच्यावरच राहल्याचे सांगितल्या जाते. वानखेडे कधीच काही चूक करणार नाही, असा हा फडणवीस यांचा वानखेडे यांच्यावरील विश्वासाचा शिक्का असल्याचे भाजप वर्तुळ बोलते. आर्वीत वानखेडे यांनी कार्य करणे सुरू केले अन आर्वीकरांना विकास कामांचा झपाटाच पाहायला मिळाला.

हेही वाचा – धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याचे दर घसरले… हे आहेत आजचे दर…

ज्येष्ठ पत्रकार विजय अजमिरे म्हणतात, की मागील तीन वर्षांत जी कामे आर्वीत दिसली ती आर्वीकरांनी कधीच पाहली नाही. म्हणून केवळ भाजपचेच नव्हे तर इतर अनेक लोकही त्यांच्याशी जुळले आहे. अनेक प्रकारच्या समस्या मार्गी लागल्या. त्यामुळे निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाले, याचा आर्वीत जल्लोष सुरू झाला आहे.