अमरावती: राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होणार असून, पुढील शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार १६ जूनपासून सुरू होणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी मंगळवारी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता, सुसंगती राहण्यासाठी उन्हाळी सुटी, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने उचित निर्णय घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १६ जून २०२५ रोजी सुरू कराव्यात. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार २३ जून ते २८ जून २०२५ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ या वेळेत सुरू कराव्यात. सोमवार ३० जून पासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.
या सूचना सर्व विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीनंतर राज्यभरातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या होत्या, तर विदर्भातील शाळांची पहिली घंटा मात्र १ जुलैला वाजली होती.
गेल्या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु होत असताना सकाळी लवकर भरणाऱ्या शाळा आता ९ वाजता भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध निर्णय घेण्यात येतात.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळा आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी दप्तराविना भरणार असे सांगण्यात आले होते. त्यामुळे पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शनिवारी दप्तर नेण्याची आवश्यकता उरली नव्हती. विद्यार्थ्यांचा विचार करीत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून धोरणात अनेक बदल करण्यात आले. यंदा कोणत्या नवीन सूचना देण्यात येतात, याची प्रतीक्षा आहे.