नागपूर : ज्या समाजाने आपल्याला कायम पाठींबा दिला, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव फार कमी लोकांना असते. ज्यांना ही जाणीव असते ते समाजाचे पांग फेडतात, पण हे दातृत्व ते समोर येऊ देत नाहीत. सुनील गावस्कर ही क्रिकेटविश्वातील मोठी आसामी, पण क्रिकेटविश्वातून सेवानिवृत्ती पत्करल्यानंतर ते जे काम करत आहेत, ते त्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठे आहे.
१९९९ साली सुनील गावस्कर यांनी चॅम्प्स फाउंडेशन स्थापन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या अनेक खेळाडूंना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधीकाळी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अनेक खेळाडूंना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करावे लागत आहे. गावस्करांना हे पटले नाही आणि त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नियमित आर्थिक मदतकार्य सुरू केले आहे.
हेही वाचा – अनिल देशमुख म्हणाले, “कारागृहात माझा प्रचंड छळ, दहशतवादी कसाबला ठेवलेल्या..”
“हार्ट टू हार्ट” फाऊंडेशनच्या माध्यमातून विशेषकरून लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली जाते. त्यांच्या ३५ शतकांची आठवण म्हणून ते स्वतः ३५ शस्त्रक्रियांचा खर्च दरवर्षी स्वतः उचलतात. जोपर्यंत आपण खर्च करणार नाही, तोपर्यंत लोक संस्थांना निधी कसा दान करणार, असे त्यांचे म्हणणे आहे. गावस्करांचे संपूर्ण कुटुंब सत्य साईबाबांचे भक्त आहे आणि म्हणूनच साईसंजीवणी रुग्णालयाच्या देशविदेशातील शाखांमध्ये ते सक्रीय आहेत. देण्यामध्ये जो आनंद आहे तो घेण्यामध्ये नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.