नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका राज्यात होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रमुख मुद्दा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आहे. प्रत्येक उमेदवार हाच मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करीत आहे. हाच धागा पकडून माजी मंत्री सुनील केदार यांनी पेन्शन योजनेबाबत भाजप दुटप्पी धोरणावर टीका केली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांची प्रचारसभा रविवारी नागपुरात झाली. यावेळी केदार यांनी भाजपला पेन्शनच्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला.
आणीबाणीच्या काळात मिसाबंदी कायद्याखाली अटक झालेल्या बहुतांश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना पेन्शन लागू करण्यात आली आहे. त्यावरून माजी मंत्री सुनील केदार यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिक्षकांना जुनी पेन्शन दिल्यास आर्थिक गणित बिघडते, पण कायद्यात नसतानाही तुमच्या लोकांना पेन्शन देता, तेव्हा आर्थिक बिघडत नाही काय, असे सत्तेत बसलेल्यांना विचारले पाहिजे, असे माजी मंत्री केदार म्हणाले.