नागपूर : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची मेडिकल रुग्णालयातून सुटी होताच पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात कारागृहात रवानगी करण्यात आली. यावेळी केदार यांच्या शेकडो समर्थकांनी कारागृहासमोर गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जामिनावर निर्णय पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे केदारांचा कारागृहातील मुक्काम किमान दोन दिवस निश्चित आहे. शनिवारी ३० डिसेंबरला नागपूर सत्र न्यायालय जामिनावर निर्णय सुनावणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेडिकल रुग्णालयात केदार यांची शेवटची तपासणी गुरुवारी रात्री सात वाजता करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्वस्थ असल्याचा अहवाल देऊन रुग्णालयातून सुटी मंजूर केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक रुग्णालयात आले. त्यांनी केदार यांना वाहनातून मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. रात्री साठेआठ वाजताच्या सुमारास केदार यांना कारागृहात दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर त्यांना कारागृहातील बराकमध्ये पाठविण्यात आले.

हेही वाचा – करोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती

केदार यांनी सत्र न्यायालयात दोषसिद्धीला स्थगिती तसेच जामिनासाठी अर्ज केला आहे. मंगळवारपासून रोज याप्रकरणावर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी यावर अंतिम निर्णय येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र न्यायालयाने निर्णय आणखी दोन दिवस पुढे ढकलला आहे. निर्णयासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र निर्णयाचे टंकलेखन सुरू असल्याचे कारण देत दुपारी ३ वाजताची वेळ देण्यात आली. न्यायालयाची कारवाई प्रत्यक्षात साडेचार वाजता सुरू झाली. सायंकाळी ६ च्या सुमारास न्यायाधीशांनी नव्या तारखेची घोषणा केली. यादरम्यान दोन्ही पक्षांनी पुन्हा युक्तिवाद केला.

हेही वाचा – वर्धा : हिंदी विद्यापीठात ठिय्या आंदोलन सुरू, विधी शाखेस मान्यता नसल्याचा वाद

एका आरोपीचा नव्याने अर्ज

आरोपी अशोक चौधरी यांनी सुधारित अर्ज दाखल केल्याने गुरुवारी पुन्हा दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला. केदार यांच्या वकिलांनी यावर नाराजी व्यक्त केली. चार दिवसांपासून न्यायालयाच्या आदेशाची वाट बघत आहोत, मात्र कधी कुणी नव्याने अर्ज दाखल करतो तर कधी सरकारी वकील वेगळाच मुद्दा उपस्थित करतात. सत्र न्यायालयाला दोषस्थगितीवर निर्णय घ्यायचा आहे, शिक्षा द्यायची नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा, अशी विनंती केदार यांच्या वकिलांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil kedar sent to jail decision on bail on december 30 adk 83 ssb