वाशीम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल ४ जुलै रोजी जाहीर झाला. यामधे वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ असलेल्या रंजितनगर लभान तांड्यावरचा सुनील खचकड हा राज्यात प्रथम आला आहे.रंजितनगर पाळोदी गावाला लागून असलेला २०० ते २५० लोकसंख्या असलेल्या ‘मथुरा लभान’ जातीच्या लोकांचा तांडा आहे. सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती होती. त्यात उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने घरी अठराविश्र्व दारिद्र्य.
तरीही अश्या बिकट परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करून त्याला शिक्षणासाठी मदत करीत होते सुनिलनेही मोल मजुरी करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीतून बीए केलं. घरची परिस्थिती बदलायची असेल तर नोकरी मिळवणं हेच ध्येय ठेवून सुनीलने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहा वर्षांपूर्वी संभाजीनगर गाठले. महागडे क्लास लावणं शक्य नसल्याने मित्रांच्या साथीने अभ्यास सुरु केला आणि २०१८ साली पहिला निकाल आला. तेव्हा सुनीलसह आणखी दोघांना सामान गुण होते. म्हणून जास्त वय असलेल्याला संधी मिळाली आणि सुनील कटला होता. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. पण सुनील खचला नाही त्याने पुन्हा तयारी सुरु केली.
हेही वाचा >>>अकोला : रुळावरून चालतांना कानात हेडफोन अन् मागून धडधड मालगाडी आली…पुढे..
२०१९ साली लागलेल्या निकालात सुनीलला ४ गुणाने पुन्हा हुलकावणी मिळाली. मात्र खचून न जाता सुनील ने जीवापाड कष्ट करून अभ्यास केला आणि आज तो राज्यात प्रथम आला. त्याने केवळ कुटुंबाचेच नव्हे तर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.