नागपूर : निवडणुका आणि कामांमधील अनियमिततेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर चौफेर टीका सुरू असतानाच आता त्यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. मागील दोन दिवसांपासून कुलगुरूंच्या उपस्थितीत ‘मॅडम सुपर कुलगुरू’ कंत्राटी प्राध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांना इंडियन सायन्स काँग्रेससाठी प्रोत्साहित करीत आहेत. त्यांचा हेतू चांगला असला तरी विद्यापीठातील कुठल्याही संविधानिक पदावर किंवा प्राधिकरणांवर नसतानाही त्या कुठल्या अधिकाराने बैठका घेतात, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात विचारला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती झाली असली तरी ‘मॅडम सुपर कुलगुरू’ यांच्याशिवाय विद्यापीठाचे पानही हलत नाही, ही बाब अनेकदा समोर आली आहे. विद्यापीठाच्या कुठल्याही प्रशासकीय पदावर वा प्राधिकरणावर नसतानाही येथील प्रत्येक निर्णयामध्ये त्यांच्या हस्तक्षेपाचा आराेप होतो. कुलगुरू, प्र-कुलगुरूंच्या कार्यालयात त्यांचा वावर असतोच. त्यात आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या संघटनेला मोठे यश मिळाले. त्यामुळे विद्यापीठातील त्यांची पकड अधिक घट्ट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी विद्यापीठामध्ये आता चक्क बैठका घेणे सुरू केल्याची माहिती आहे.

हेही वाचा: न्यायालयाची नागपूर विद्यापीठ प्रशासनाला चपराक; १७ डिसेंबरच्या पदवीधर निवडणुकीला स्थगिती

विद्यापीठामध्ये ३ ते ७ जानेवारी रोजी इंडियन सायन्स काँग्रेस होणार आहे. यामध्ये महिला काँग्रेसचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये अधिकाधिक महिलांची उपस्थिती वाढवणे आणि नोंदणी करण्याची जबाबदारी ‘मॅडम सुपर कुलगुरू’ यांनी स्वीकारल्याचे दिसून येते. यासाठी त्यांनी विद्यापीठामध्ये दोन दिवस कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यामध्ये कंत्राटी प्राध्यापकांचाही समावेश होता. या बैठकीला खुद्द कुलगुरू डॉ. चौधरीही उपस्थित होते. बैठकीमध्ये महिला काँग्रेससाठी गर्दी कशी करता येईल, अधिकाधिक लोकांची नोंदणी कशी वाढवता येईल यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा: लैंगिक शोषण जनजागृती मोहिमेकडे विद्यापीठांची पाठ; विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्राकडे दुर्लक्ष

१०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस नागपूर विद्यापीठात होणे ही गौरवाची बाब असल्याने सर्वांनी त्यांच्या सूचनांचा आदरही केला. मात्र, विद्यापीठामध्ये इतके प्रशासकीय अधिकारी असताना व खुद्द कुलगुरू बैठकीला उपिस्थत असताना ‘मॅडम सुपर कुलगुरू’ कुठल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतात, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superfast meetings by super vice chancellors in nagpur university a new controversy broke out again at nagpur dag 87 tmb 01