बुलढाणा : अकोला जिल्ह्यातील पारस येथील मंदिर दुर्घटनेसाठी अंधश्रद्धा व अघोरी पूजा जबाबदार असल्याच्या आरोपाची चौकशी करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणावजा माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. या घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनच करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री सत्तार यांनी सोमवारी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून पारस येथील मंदिर परिसराला भेट दिली. यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा व अंबिकापूर (ता. खामगाव) या गावातील बाधित शेतीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी वरील महत्त्वपूर्ण माहिती दिली. पारस येथील मंदिर दुर्घटनेसाठी अंधश्रद्धा व अघोरी पूजा जबाबदार असल्याच्या आरोपाबाबत विचारणा केली असता, त्यांनी याची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. यावर आत्ताच काय ते सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. मंदिरावर पडलेले झाड दीडशे वर्षे जुने व आतून पोकळ झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. सर्व जखमींच्या शासकीय वा खासगी रुगणलायतील उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – “संजय राऊत यांचं डोकं फिरलंय!”, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची टीका; म्हणाले, “प्रभू रामचंद्र त्यांना..”

हेही वाचा – “शेतकरी संकटात अन् राज्यकर्ते यात्रेवर!”, खासदार अरविंद सावंत यांची टीका; म्हणाले, “आता तर लोकशाही बचाव..”

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त मदत करण्यात येईल. आपण आपला अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना सादर करणार असून, त्यांना केंद्राच्या निकषापेक्षा जास्त मदत करण्याचे अधिकार आहे. याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

Story img Loader