ही व्यथा आहे रामकोर सखाराम पवार या वृद्ध व गरीब मातेची. त्या मूळच्या मेहकर तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील रहिवासी. आपल्या मुलाचे मुकादमाने उसतोडीसाठी अपहरण केले, असा त्यांचा आरोप आहे. यासाठी मेहकर पोलीस ठाणे, बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी दिल्या, स्मरण, तक्रारपत्र दिले, पण काहीच झाले नाही. तुझ्या मुलाला दोन दिवसात परत आणतो, अशी वांझोटी आश्वासने पोलिसांकडून मिळाली. मात्र, ना न्याय मिळाला ना मुलाचा पत्ता! त्यामुळे उपेक्षित वडार समाजाची ही महिला हवालदिल झाली असून पोटच्या मुलाची अन् त्याच्या फोनची आतुरतेने वाट पाहत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चंद्रपूर: हजारावर पंचनाम्यामध्ये फेरबदल, पीक विमा कंपनीचे पितळ उघड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

परिस्थिती बिकट असल्याने व काही गावकऱ्यांच्या जाचामुळे त्या सध्या आपल्या बहिणीच्या घरी आश्रयाला आहेत. आज पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भेट झाल्यावर त्यांनी त्यांची दुर्दैवी कथा माध्यमांना सांगितली. आपला मुलगा सुनील याचे ऊसतोड मुकादम दत्ता कुशलकर याने गेल्या २९ ऑगस्ट २०२२ रोजी ब्रम्हपुरी येथून अपहरण केले. मेहकर पोलीस ठाण्याला तशी तक्रारही दिली. याची प्रतिलिपी पोलीस अधीक्षकांना दिली. मात्र, सात महिन्यांत कारवाई तर सोडा, साधी दखलसुद्धा घेण्यात आली नाही. आज व १४ मार्च २०२३ रोजी त्यांनी स्मरणपत्र देऊन “माझ्या मुलाचा शोध घ्या हो सायब”, अशी विनवणी केली. आतातरी पोलीस विभागाने न्याय द्यावा, अशी मागणी रामकोर पवार या वृद्धेने केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supervisor kidnapping a boy for cutting sugarcane in buldhana scm 61 amy