अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारंभ रविवारी पार पडला. या समारंभाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई उपस्थित होते. भूषण गवई यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. संत गाडगेबाबा आणि दिवंगत नेते रा. सु. गवई यांच्या निकटच्या संबंधांविषयी भाष्य केले. सोबतच विद्यापीठासोबत असलेल्या ऋणानुबंधाविषयी देखील भावना व्यक्त केल्या. न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि माझा नजीकचा संबंध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९२ ते २००३ पर्यंत मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा वकील म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. विद्यापीठाविषयी असलेल्या आत्मियतेमुळे मी या कालावधीत एक रुपयाही मानधन वाढवून मागितले नाही, याचा मला आनंद आहे.

भूषण गवई म्हणाले, संत गाडगेबाबा आणि माझे वडील रा. सू. गवई यांच्यात नजीकचा संबंध होता. रा. सू. गवई हे विद्यार्थी असताना संत गाडगेबाबा हे त्यांना अनेकवेळा सोबत प्रवचनाला घेऊन जात होते. प्रवचनाच्या आधी त्यांना ते भाषण करायला सांगायचे. माझ्या वडिलांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या पायाभरणीत गाडगेबाबांचे मोलाचे योगदान आहे. रा.सू गवई यांच्या भव्य स्मारक विद्यापीठाच्या नजीकच उभारले जात आहे. तेथील सुविधांचा वापर विद्यापीठाला करता येऊ शकेल.

भूषण गवई म्हणाले, स्वत:ची प्रगती साधत असताना सभोवताली जे अभावग्रस्त आहेत, त्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजासाठी सकारात्मक योगदान देणे, ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजात अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे ही सुशिक्षित लोकांची जबाबदारी आहे. त्यासाठी जीवनात मूल्यांचे आचरण करणे आवश्यक ठरते. मूल्यशिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रगतीसाठी नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या समृद्धीसाठी महत्वाचे आहे. मूल्य शिक्षणाने नैतिकता निर्माण होते.

शिक्षणाने तुम्हाला प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक बनविले आहे. शिक्षणाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा, ही सामाजिक बांधिलकीची जाणिव महत्वाची आहे. शिक्षण तुम्हाला समाजात परिवर्तन घडविणारे नेते बनवते. संत गाडगेबाबा म्हणत असत, की माणसात माणुसकी हवी, तेव्हाच समाज प्रगती करेल. माणूसधर्म म्हणजे काय, हे तुम्ही अवगत करून घेतले पाहिजे. त्यादृष्टीने सतत वाचन करणे गरजेचे आहे. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.