लोकसत्ता टीम

नागपूर: संविधानानुसार संसदेला कायदे करण्याचे सर्वाधिकार आहेत. त्यानुसार वक्फ बोर्डाबाबत मुस्लिम बांधवांच्या हिताचा कायदा केला गेला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे बघता न्यायालयाने संसदेपेक्षा मोठे होऊ नये, असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

नागपुरातील रविभवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले पुढे म्हणाले, भारतीय संसदेला कायदा करण्याचा सर्वाधिकार आहे. न्यायालयाने कायद्याचे पालन करावे. केलेल्या कायद्यावर चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आम्हाला आदर आहे. परंतु वक्फवरील टीकेनंतर सर्वोच्च न्यायालयाला अशा पद्धतीचे निरीक्षणे नोंदवण्याचा अधिकार आहे का ? त्याबाबत संसदेत विचार करण्याची गरज असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

उद्धव- राज प्रमाणेच प्रकाश आंबेडकर रामदास आठवलेंनी एकत्र यावे…

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. परंतु हे शक्य नाही. उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे सोबत जायचे असल्यास मविआ पासून दूर व्हावे लागेल. दोघे एकत्र येत असल्यास सगळ्यांना आनंदच होईल. परंतु त्याचा राज्यातील राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि आम्हीही एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी पुढेही प्रयत्न करत राहणार असल्याचेही रामदास आठवले म्हणाले. मराठी भाषेचा आम्हालाही अभिमान आहे. परंतु प्रत्येकाला राष्ट्रभाषा हिंदी व जगात प्रगती करायची असल्यास इंग्रजी यायलाच हवी. मराठीच्या नावावर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करत असल्यास ते योग्य नाही. हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही आठवले म्हणाले.

महाबोधी महाविहारच्या ट्रस्टवर बौद्ध सदस्यच हवे

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी देशभरात आंदोलन होत असून त्याला आमचे समर्थन आहे. या मागणीसाठी जोगेंद्र कवाडे यांच्या आंदोलनाला समर्थन असून त्यात आमच्या पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.