गडचिरोली : विकासाचे स्वप्न दाखवून जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सूरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यात आले. मात्र, यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून बेदरकार अवजड वाहतुकीमुळे लोकांचा नाहक बळी जातोय. रविवारी याचमुळे एका १२ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलीस विभागाने कोणतीही हयगय न करता थेट कंत्राटदार कंपनी ‘लॉयड मेटल्स’वर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.
रविवार, १४ मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आष्टी येथे लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून सूरजागड येथून सुरू असलेल्या वाहतुकीविरोधात प्रचंड रोष आहे. सूरजागड लोहप्रकल्पामुळे विकास होणार, रोजगार निर्माण होणार, असे स्वप्न या भागातील नागरिकांना दाखविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हा प्रकल्प लोकांच्या जीवावर उठला आहे. अजूनपर्यंत कोनसरी येथे प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे उत्खनन केलेल्या सर्व खनिजाची बाहेर विक्री करण्यात येत आहे. यातून कंपनीला कोट्यवधींचा नफा होतोय. परंतु यामुळे सूरजागड ते चंद्रपूर मार्ग पूर्ण खराब झाला. या मार्गावर कायम अपघात होत असतात. निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागत आहे. धुळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. परंतु प्रशासनाचे कंपनीला झुकते माप असून नागरिकांच्या जीवाचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि सर्व अपघातांची योग्य चौकशी करावी व वाहतूक कंपन्यांसह ‘लॉयड मेटल्स’वर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्राम्हणवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
लोकप्रतिनिधी गप्प का?
सूरजागड येथील अवजड वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. धुळीमुळे शेती बुडाली. तरीही जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने अद्याप विरोध केलेला नाही. ते सुध्दा कंपनीच्या दबावात आहे काय, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस सहा महिन्यातून येतात, पर्यटन करून जातात. त्यांनाही जिल्ह्यातील समस्येचे पडलेले नाही. त्यामुळे रस्ते दुरुस्त केल्याशिवाय जर वाहतूक केली तर काँग्रेसकडून मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे