नागपूर : विधानसभेचे निकाल जाहीर होताच काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा समोर येऊ लागली आहे. कामठीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी या पराभवाला काँग्रेसचे कामठी नगर परिषदेतील पदाधिकारी कारणिभूत असल्याचा आरोप केला आहे.
कामठी नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे कामठी येथून काँग्रेसला चांगले मतदान होईल, असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. यासाठी नगर परिषदेतील काँग्रेसचे काही पदाधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी पक्ष हिताकडे दुर्लक्ष केले. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे काम केले. पक्षातील लोकांनीच अशाप्रकारे पक्षविरोधी काम केल्याने पक्षाला मतदान कमी मतदान झाले आणि आपला निसटता पराभव झाला, असा दावाही भोयर यांनी केला. पक्षाच्या उमेदवाराऐवजी इतर पक्षाला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे, असेही ते म्हणाले.
भाजपने जो एकतर्फी निवडणुकीचा प्रचार केला गेला, त्याला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. कामठी मतदारसंघात काँग्रेसला चाहणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यांनी मला भरभरून मतदान केले. त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला अखेपर्यंत कडवी झुंज देऊ शकलो. त्यासाठी आपण मतदारांचे आभार मानतो. काही दिवसांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी या निवडणुकात सर्व ताकदीने उतरणार असून जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा फडकवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
स्वपक्षीयांवर गैरव्यवहाराचे आरोप
भोयर यांनी कामठी नगरपरिषदेतील गैरव्यवहारावरून स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. पक्षाच्या नावाने नगर परिषदेत सत्ता स्थापन करून काही पदाधिकारी सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. नगरपरिषदेच्या कामात गैरव्यवहार करण्यात याच पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. अशा भ्रष्ट पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाची बदनामी होत आहे, असेही भोयर यांनी स्पष्ट केले आहे.