नागपूर : भगवा ध्वज असताना तिरंगा कशाला, मनुस्मृती असताना राज्यघटना कशाला अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४७ साली घेतली होती. आज देशाचे पंतप्रधानही याच मानसिकतेचे असल्याने देशासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे, देश संकटात सापडला आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
पीपल फाॅर इक्वॅलिटी, एमिटी अँड कम्युनल इमॅसिवेशन (पीस) या संघटनेतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत ‘निर्भय बनो’च्या २५ सभा झाल्या असून नागपुरातील ही २६ वी सभा होती. व्यासपीठावर ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे उपस्थित होते.
हेही वाचा – पतीचे दुसरीवर जडले प्रेम, घटस्फोटासाठी पत्नीचा छळ; विवाहितेने गाठले…
द्वादशीवार म्हणाले, संघाची जी भूमिका १९४७ साली होती ती आजही आहे. महात्मा गांधी यांची हत्या झाली तेव्हा नाथुराम गोडसे याचा निषेध संघाने केला नाही आणि आजही ते गोडसेचा निषेध करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच मानसिकतेतून तयार झाले आहेत. पदवीशून्य पंतप्रधान आणि तडीपारीतील आरोपी आज गृहमंत्री आहेत. शिक्षणाचा गंध नसलेले शिक्षण मंत्री आपण काही वर्षे बघितले. या देशातील जनतेवर या लोकांनी भुरळ पाडली असे म्हटले जाते. परंतु ते खरे नाही. बहुजनांनी कधी त्यांना स्वीकारले नाही. मात्र, साक्षर, पदवीधर लोकांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही. त्याचा परिणाम आज देश भोगत आहे.
भाजपचे नेते अत्यंत भ्रष्ट असल्याचे सांगताना द्वादशीवार म्हणाले, नागपुरात एक हजार कोटी रुपयांचे खासगी इस्पितळ एका मंत्र्याने उभारले आहे. मंत्रीपदावर असताना इस्पितळाच्या व्यवस्थापनात पदाधिकारी राहता येत नाही म्हणून दुसऱ्याला पुढे केले आहे. तसेच आणखी एका मंत्र्याने २०० कोटी रुपयांचे फार्महाऊस बांधले. काही वर्षांपूर्वी मोडक्या-तोडक्या दुचाकीवर फिरणाऱ्या आणि आज मंत्री असलेल्या भाजपाच्या एका नेत्याने विमान खरेदी केले आहे. हे सगळे भ्रष्टाचारातून झाले आहे आणि हेच नेते लोकांना नैतिकता, संस्कृती शिकवत आहेत, अशी जोरदार टीकाही द्वादशीवार यांनी केली. प्रास्ताविक शरद पाटील यांनी केले. संचालन युगल रायुलू यांनी केले. आभार वंदन गडकरी यांनी मानले.
हेही वाचा – उपराजधानीत चोवीस तासांत दोन हत्याकांडाने खळबळ
ही गर्दी म्हणजे परिवर्तनाची नांदी
यावेळी लीलाताई चितळे म्हणाल्या, काही लोकांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध बोलावे आणि जनतेने ते जाणीवपूर्वक ऐकायला यावे ही परिवर्तनाची नांदी आहे. ॲड. असीम सरोदे म्हणाले, कायद्यात बदल करणे किंवा कायदे करणे हे लोकसहभागातून व्हायला हवे. परंतु कुठल्याही चर्चेविना कायदे केले जात आहेत. त्यांना कायदा करायचा असेल तर संसदेत खोटे बोलणाऱ्यांविरुद्ध कायदा करून दाखवावा.
मोदी, शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक
डॉ. चौधरी म्हणाले, मोदी आणि शहा २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून निर्भय बनो हे आंदोलन आहे. मोदी, शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी पुढील लढाई राहणार आहे. लोकशाहीला नख लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू.