लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : ११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सरपंचाच्या खुनासह पोलिसांसोबतच्या चार चकमकींमध्ये ती सहभागी होती.

रजनी वेलादी ही ऑगस्ट २००९ मध्ये फरसेगड दलममध्ये सदस्य म्हणून नक्षली चळवळीत सामील झाली. २०१० पर्यंत ती सक्रिय होती. २०१० मध्ये ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३ पर्यंत ती कार्यरत राहिली. २०१३ मध्ये नॅशनल पार्क एरिया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन तिची एरिया कमिटी मेंबर म्हणून पदोन्नती झाली. २०१५ पर्यंत ती कार्यरत होती. त्यानंतर तिची सांड्रा दलममध्ये बदली झाली व तेव्हापासून ती या दलममध्येच कार्यरत आहे. २०२०- २१ मध्ये उपराल (छत्तीसगड) येथील एका सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय २०१५ मध्ये गुंडम येथील पोलीस चकमकीत ती सहभागी होती.

आणखी वाचा-बुलढाणा : खामगावात धाडसी दरोडा; घरमालक परगावी अन्…

२०१७ मध्ये बेज्जी- येर्रागुफा मार्गावरीील चकमकीत छत्तीसगडचे १२ जवान शहीद झाले होते. यात देखील ती सहभागी होती. २०१८ मध्ये मारेवाडा व २०१९ मध्ये बोरामज्जी जंगलातील चकमकीतही रजनी वेलादीचा सहभाग होता.२०१८ मध्ये बेद्रे रोडवर शासकीय वाहन पेटवून दिले होते, यामध्येही ती सामील होती. दरम्यान, तिच्यावर छत्तीसगड सरकारने ६ तर महाराष्ट्र शासनाने ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. जिल्ह्यात मागील पावणे दोन वर्षांत १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते.

साडेचार लाखांचे बक्षीस, भूखंडही मिळणार

दरम्यान, नक्षल्यांसाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाने आत्मसमर्पण योजना लागू केली. यांतर्गत रजनी वेलादीला पुनर्वसनाकरता केंद्र व राज्य सरकारकडून एकूण साडेचार लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय नवेगाव परिसरात भूखंड दिला जाणार असून रोजगार देखील मिळवून दिला जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surrender of jahal female naxalite rajni samaya veladi ssp 89 mrj
Show comments