लोकसत्ता टीम
गडचिरोली: विविध हिंसक गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन नक्षल्यांनी २४ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दोघांवर एकूण ८ लाखांचे बक्षीस होते. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांना मोठा धक्का समजला जात आहे. अडमा जोगा मडावी (२६,रा.जिलोरगडा पामेड ता. उसूर जि.बिजापूर , छत्तीसगड), टुगे कारु वड्डे (३५,रा.कवंडे बेद्रे ता.बैरामगड जि.बिजापूर छत्तीसगड) असे आत्मसमर्पित नक्षल्यांनी नावे आहेत.
आणखी वाचा-नागपूर: लेखक काचमहालात बसण्यासाठी नाही, तो व्यवस्थेला प्रश्न विचारणारच!
गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मडावी हा २०१४ मध्ये एलजीएस या नक्षली दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. २०२१ पर्यंत तो कार्यरत होता. त्यानंतर झोन ॲक्शन टीममध्ये बदली होऊन त्याने जून २०२३ मध्ये दलम सोडून घरी परतणे पसंत केले. वड्डे हा २०१२ मध्ये जाटपूर दलममध्ये जनमिलीशीय सदस्य पदावर भरती झाला व २०२३ पर्यंत कार्यरत राहून नंतर दलम सोडली. अडमा मडावीवर पाच खुनांसह चकमकीचे आठ, जाळपोळचा एक व इतर दोन गुन्हे नोंद आहेत तर टुगे वड्डेवर सहा खुनांचा आरोप असून जाळपोळीचा एक गुन्हा नोंद आहे. मडावीवर राज्य शासनाने सहा लाखांचे तर वड्डेवर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मडावी याने लाहेरी व वड्डे याने भामरागड पोलिसांना संपर्क करुन आत्मसमर्पण केले.